पुणे : गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. असं असलं तर केरळ आणि महाराष्ट्रात मात्र वाढत्या रुग्णसंख्येनं प्रशासनाची डोकेदुखी वाढवली आहे. कोरोना रुग्णांच्या वाढत्या रुग्णांबाबत गृहमंत्रालय देखील चिंतेत आहे. याच पार्श्वभूमीवर गृहसचिव अजय भल्ला यांनी राज्य सरकारं आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहिलं आहे. हे पत्र समोर आल्यानंतर अजित पवार यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. एकीकडे पत्र पाठवून योग्य ती काळजी घेण्याबाबत आदेश द्यायचे आणि दुसरीकडे जनआशीर्वाद यात्रा काढून लोकांची गर्दी जमवायची याबाबत अजित पवारांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

अधिक वाचा  स्थानिक स्वराज्य संस्था: ओबीसी जागांच्या निवडणुका ही स्थगित - राज्य निवडणूक

गृह सचिव अजय भल्ला यांनी राज्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं की, ज्या जिल्ह्यांत कोरोना संसर्गाचा दर अधिक आहे. अशा जिल्ह्यांत तातडीनं पावलं उचलत संक्रमण कमी करण्यासाठी आवश्यक ती सर्व कार्यवाही करावी. तर सण, उत्सव साजरे करताना गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. लोकांची गर्दी रोखण्यासाठी स्थानिक पातळीवर सक्ती करा असंही त्यांनी म्हटलं आहे.

हे पत्र आल्यानंतर अजित पवार यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी म्हटलं की, केंद्रानं केंद्राचं काम केलंय, आता महाराष्ट्रानं आपलं काम करायचंय. केंद्राला काळजी वाटली म्हणून त्यांनी पत्र पाठवलं. आपणही नियम पाळले पाहिजेत, गर्दी टाळली पाहिजे. केंद्रानं राज्यांना सल्ला दिला आहे. मात्र, दुसरीकडे नवीन 4 केंद्रीय मंत्र्यांना कसल्या यात्रा काढायला सांगतात. आगामी काही दिवसांतच या यात्रेच्या ठिकाणी कोरोनाचा फटका बसलेला दिसेल. उद्या याठिकाणी रुग्ण वाढले तर याला कोण जबाबदार? असा सवालही अजित पवार यांनी केला आहे.

अधिक वाचा  ४ डिसेंबरला का साजरा केला जातो? भारतीय नौदल दिन; जाणून घ्या इतिहास आणि महत्व

यावेळी अजित पवारांना अनिल देशमुखांबाबत विचारलं असता, ते म्हणाले की, जोपर्यंत रिपोर्ट मिळत नाही. तोपर्यंत मी यावर बोलणार नाही, अशाप्रकारच्या अनेक चौकशा होत असतात. त्यावेळी सर्वजण चौकशीसाठी मदत करत असतात. त्यामुळे सध्या यावर काहीही बोलणार नाही, असंही पवार म्हणाले आहेत.