नवी दिल्ली : काेराेना प्रतिबंधक लसीकरणाचा भारताने आज उच्चांक गाठला. एका दिवसात सर्वाधिक १ कोटी डोस देण्यात आले. आतापर्यंत ६२ काेटी डाेस देण्यात आले असून देशाच्या जवळपास अर्ध्या लाेकसंख्येला किमान एक डाेस देण्यात आला आहे.

केंद्र सरकारने डिसेंबरपर्यंत सर्व नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट ठेवले हाेते. त्यासाठी दरराेज एक काेटी डाेस देण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले हाेते. शुक्रवारी हे लक्ष्य गाठण्यात यश आले. शुक्रवारी उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक २८ लाख डाेस देण्यात आले. त्याखालाेखाल महाराष्ट्रात ९ लाख ९० हजार डाेस देण्यात आले.

अधिक वाचा  शेतमालाची ‘विकेल ते पिकेल’ अंतर्गत १२४५ ठिकाणी विक्रीव्यवस्था

अर्ध्या लाेकसंख्येला किमान एका डोसचे कवच

देशभरात एकूण ६२ काेटी १२ लाख ११ हजार ७१३ डाेस देण्यात आले आहेत. त्यापैकी ४८ काेटी लाेकांना पहिला डाेस तर १४ काेटी लाेकांना दाेन्ही डाेस देण्यात आले आहेत. त्यामुळे देशाच्या जवळपास अर्ध्या लाेकसंख्येला किमान एक डाेस देण्यात आला आहे.

…तरीही काळजी आवश्यक

लसीकरणाचा आकडा वाढला असला तरीही नागरिकांनी काळजी घेणे अतिशय आवश्यक आहे. सप्टेंबर आणि ऑक्टाेबरमध्ये तिसरी लाट येऊ शकते, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये नव्या रुग्णांच्या संख्येत वाढ दिसून आली आहे. अशा परिस्थितीत काेराेना प्रतिबंधक नियमांचे काटेकाेरपणे पालन करण्याचे आवाहन आराेग्य मंत्रालयाने केले आहे.