मुंबई – ओबीसी आरक्षण कायम ठेवण्यावर सर्वपक्षीयांचे एकमत झाले आहे. आता यासंदर्भात पुढील शुक्रवारी पुन्हा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत प्राप्त झालेल्या सूचना आणि विविध पयार्यांचा अभ्यास करून निर्णयाप्रत येण्यासाठीचा आढावा घेण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. दरम्यान ओबीसींच्या आरक्षणाला कुणाचाही विरोध नसल्याची प्रतिक्रिया कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.

या बैठकीस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री छगन भुजबळ, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मंत्री बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार,अनिल परब, अशोक चव्हाण यांच्यासह सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. मात्र, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे बैठकीला अनुपस्थित होते.

अधिक वाचा  किरण गायकवाड ‘देवमाणूस २’मध्ये दिसणार कि नाही?

उद्धव ठाकरे म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये ओबीसींना राजकीय आरक्षण मिळालेच पाहिजे यावर सर्वपक्षांचे एकमत आहे. राजकीय आरक्षणामध्ये येणाऱ्या अडचणी दूर करण्याबाबत सर्वांनी केलेल्या सूचनांचे स्वागत आहे. ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होऊ नयेत ही सर्वांचीच भावना असल्याचे ते म्हणाले. दरम्यान आजच्या बैठकीत प्राप्त झालेल्या सुचना आणि पर्यायांचा येत्या काही दिवसात अभ्यास करून येत्या शुक्रवारी यासंबंधाने सर्व सहमतीने निर्णय घेऊ असे ते म्हणाले.

या बैठकीनंतर मंत्री छगन भुजबळ म्हणाले, इम्पेरिकल डेटा मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. देवेंद्र फडणवीस यांनीही प्रयत्न केले. कपिल सिब्बल हे राज्य सरकारचे सरकारी वकील आहेत. ते ही बाजू मांडतील. डेटा मिळवायला प्रयत्न सुरू आहेत काल कॅबिनेटमध्ये यावर चर्चा झाली. ही परिस्थिती सर्व पक्षांच्या नेत्यांच्या कानावर टाकली पाहिजे म्हणून आजची बैठक झाली. निवडणुका पुढे ढकलल्या तरी चालेल पण यावर आधी तोडगा निघाला पाहिजे, यावर सर्वांचे एकमत झाले असल्याचे त्यांनी सांगितले.

अधिक वाचा  राज्यात जिल्हा बँक : भाजपला मोठा झटका तर मविआ चे वर्चस्व

‘आरक्षण कायम ठेवण्यावर सर्वांचे एकमत आहे. त्यासाठी मार्ग कसा काढला जाईल यावर चर्चा झाली. राज्यातील 20 जिल्ह्यांत आरक्षण कायम राहणारच आहे. राहिलेल्या 16 जिल्ह्यांत आरक्षण कमी-जास्त होणार आहे. त्या जिल्ह्यात काय करता येईल यासाठी पुढील शुक्रवारी बैठक आहे. सर्वांची भूमिका एकमताची आहे. राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून सगळे एक झाले आहेत. आरक्षणाला कुणाचाही विरोध नाही.’

– नाना पटोले, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष