पुणे -‘खेळामुळे व्यक्‍तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास होतो. त्यामुळेच खेळांना महत्त्व देण्याची गरज आहे. त्यासाठी योग्य त्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देत, भारताला ‘स्पोर्ट्‌स पॉवर’ बनविण्याचा मानस असल्याचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे.
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी (दि.27) पुण्यातील आर्मी स्पोर्ट्‌स इन्स्टिट्यूट येथील स्टेडियमचे ‘नीरज चोप्रा आर्मी स्पोर्ट्‌स स्टेडियम’ असे नामकरण करण्यात आले. याप्रसंगी लष्करप्रमुख जनरल एम. एम. नरवणे, दक्षिण मुख्यालय प्रमुख लेफ्टनंट जनरल जे. एस. नैन उपस्थित होते.

यावेळी संरक्षण मंत्री सिंह यांच्या हस्ते टोकियो ऑलिम्पिकमध्ये भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक विजेता सुभेदार नीरज चोप्रा यांच्यासह लष्करी सेवेतील 16 ऑलिम्पिक वीरांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये सुभेदार तरुण दीप राय, नायक सुभेदार प्रवीण जाधव, सुभेदार अमित, सुभेदार मनीष कौशिक, सुभेदार मेजर सतीश कुमार,

अधिक वाचा  एकावर एक फ्री थाळी चांगलच महागात; तब्बल ८९ हजारांचा ग्राहकाला गंडा

सुभेदार सी. ए. कटप्पा, सुभेदार छोटेलाल यादव, नायब सुभेदार दीपक पुनिया, नायब सुभेदार अर्जुनलाल जाट, नायब सुभेदार अरविंद सिंग, सुभेदार विष्णूू सर्वणन, ज्युनिअर वॉरन्ट अफिसर दीपक कुमार, नायब सुभेदार अविनाश साबळे, हॉनरारी कॅप्टन अमरीश कुमार, नायब सुभेदार इरफान केटी,

ग्रेनेडीअर राहुल, सुभेदार संदीप कुमार, हवालदार गुरप्रित सिंग, पेटी ऑफिसर (नेव्ही) तेजिंदर पाल सिंह, चीफ पेटी ऑफिसर जबीर, सार्जंट शिवपाल सिंग, अलेक्‍स अँटनी, हवालदार अभिषेक पांडे यांचा समावेश होता.

सिंह म्हणाले, ‘ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंनी केलेली कामगिरी प्रशंसनीय आहे. यापुढील क्रीडा स्पर्धांमध्येदेखील जास्तीत जास्त भारतीय खेळाडू सहभागी होतील, यासाठी पायाभूत सुविधा आणि उत्तम प्रशिक्षण पुरविणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने शक्‍य ते सर्व प्रयत्न सरकारतर्फे केले जातील. तसेच भविष्यात भारत ऑलिम्पिक स्पर्धेचा आयोजक देश बनेल, असा विश्‍वास सिंह यांनी यावेळी व्यक्‍त केला.

अधिक वाचा  अवघ्या चार आणि सात वर्षाच्या चिमुकल्यांनी पार केला मलंग गड

खेळांमुळेच छत्रपती शिवाजी महाराज घडले

भारतीय इतिहासात खेळांना महत्त्व होते. खेळांमुळे व्यक्‍तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास होतो. खेळामुळेच महाराष्ट्रातील शिवा नामक मुलगा पुढे जाऊन छत्रपती शिवाजी महाराज बनले, तसेच देशातील इतरही शूरवीरांच्या इतिहासात खेळांचे महत्त्व अधोरेखित झाले असल्याचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले. तसेच खेळ आणि सैन्य यांच्यातील परस्पर संबंध अधोरेखित करत, सैनिकात नेहमीच एक प्रामाणिक खेळाडू आणि खेळाडूत एक प्रयत्नशील सैनिक असतो, असेही त्यांनी सांगितले.