काबूल: अफगाणिस्तानातील काबूल विमानतळावर झालेल्या स्फोटात आतापर्यंत 90 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 150 हून अधिक जण जखमी झाले आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या स्फोटांची जबाबदारी ISIS-K (आयएसआयएस-खुरासाना) या दहशतवादी गटाने स्वीकारली आहे. गुरुवारी अमेरिकेनं नागरिकांना काबूल विमानतळावर हल्ला होण्याचा धोका असून विमानतळापासून दूर राहण्याचा इशारा दिला होता.

याच दरम्यान अफगाणिस्तानातील सुमारे 160 शीख आणि हिंदू नागरिक आज काबूल विमानतळाजवळ झालेल्या दोन स्फोटांमधून थोडक्यात बचावले. याच्याशी संबंधित लोकांनी सांगितलं की, अफगाणिस्तानमधील अल्पसंख्याक समुदायातील शीख आणि हिंदूंनी आता एका गुरुद्वारामध्ये आश्रय घेतला आहे. दिल्ली शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मनजिंदर सिंग सिरसा यांनी यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे. अफगाणिस्तानमधून बाहेर निघण्यासाठी धडपड करणारा हा शीख आणि हिंदूंचा मोठा गट या स्फोटांमधून थोडक्यात बचावलाय.

अधिक वाचा  बौद्धजन पंचायत समितीच्या विद्यमाने प्रशिक्षित बौद्धाचार्यांच्या परीक्षा परीक्षाकेंद्रात शिस्तबद्ध वातावरणात संपन्न

सिरसा यांनी या स्फोटाचे फोटो पोस्ट करत म्हटलं की, ” आज काबूल विमानतळावर ज्या ठिकाणी स्फोट झाला त्याच ठिकाणी हे नागरिक काल उभे होते. आम्ही देवाचे आभार मानतो की काल असे काही घडले नाही.” अफगाणिस्तानची राजधानी काबूल येथील राजधानीच्या हमीद करझई आंतरराष्ट्रीय विमानतळावर झालेल्या स्फोटाच्या काही तासांपूर्वी काल रात्री सुमारे 145 अफगाण शीख आणि 15 हिंदू घटनास्थळी उपस्थित होते. गेल्या आठवड्यात तालिबान्यांनी काबूलवर कब्जा मिळवल्यानंतर देशातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते. त्याचवेळी काही मदत मिळतेय का याची पहाणी करण्यासाठी हे लोक विमातळाजवळच्या या परिसरामध्ये एकत्रित जमा झाले होते.

अधिक वाचा  राजस्थान कोटामध्ये चाललंय काय? NEET मानसिक तणावात 3 महिन्यांत 8 विद्यार्थिनीने थेट जीवन संपवलं

मात्र तिथे काहीच मदत मिळण्याची शक्यता दिसली नाही. म्हणून हे लोक परतले आणि त्यानंतर काही तासातच विमानतळावर स्फोट झाले. संशयित आत्मघाती हल्लेखोरांनी विमानतळाच्या गर्दी असलेल्या गेटवर गुरुवारी संध्याकाळी स्फोट घडवून आणले. या स्फोटात अनेकांचा जागीच मृत्यू झाला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, एका तालिबानी दहशतवाद्यानं सांगितले की, स्फोटात लहान मुलांसह बरेच लोक मारले गेलेत.भारतीय सेवाभावी संस्थेमार्फत चालवल्या जाणाऱ्या रुग्णालयामध्ये जखमींवर उपचार सुरु करण्यात आलेत.