कोल्हापूर : मेहनत, जिद्द आणि चिकाटी असेल तर प्रतिकुल परिस्थितीवर मात करत कोणतंही यश मिळवलं जाऊ शकतं. हे आतापर्यंत अनेकदा स्पष्ट झालं आहे. कोल्हापूर येथील एका रिक्षाचालकाच्या मुलीनं देखील आपल्या मेहनतीच्या जोरावर मोठ्ठं यश मिळवलं आहे. संगणक शास्त्रातील तिची गुणवत्ता पाहून एका जागतिक स्तरावरील कंपनीनं तिला तब्बल 41 लाख रुपयांची खास प्री प्लेसमेंट ऑफर देऊ केली आहे. तिच्या या यशाचं अनेक स्तरातून कौतुक केलं जात आहे. सर्वसामान्य कुटुंबातील मुलीनं अशाप्रकारचं यश मिळवल्यानं कोल्हापूरकराचं उर अभिमानानं भरून आलं आहे. अमृता विजयकुमार कारंडे असं या गुणी मुलीचं नाव असून ती केआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ट्रेनिंग आणि प्लेसमेंट विभागाच्या संगणक शास्त्र विभागात शिकत आहे.

अधिक वाचा  उद्धव ठाकरे यांच्या पहिल्या यादीमुळे आज महाविकास आघाडीतील एक नेता बनू शकतो बंडखोर

अमृत ही सर्वसामान्य कुटुंबातील असून तिचे वडील रिक्षा चालवतात तर आई गृहीणी आहे. जागतिक स्तरावरील अ‍ॅडोब कंपनीत अमृताची सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट इंजिनिअर म्हणून निवड झाली आहे. तिला कंपनीनं प्री प्लेसमेंटद्वारे 41 लाखांचं पॅकेज देऊ केलं आहे. याबाबतच पत्र नुकतंच अ‍ॅडोब कंपनीकडून पाठवण्यात आलं आहे.

तिच्या या यशानं महाविद्यालयातूनही कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. खरंतर, अमृता तृतीय वर्षात शिक्षण घेत असताना, केआयटी महाविद्यालयात अ‍ॅडोब कंपनीनं मानाची स्पर्धा घेतली होती. या स्पर्धेत चांगली कामगिरी केल्यानं अमृताची अ‍ॅडोब कंपनीकडून अडीच महिन्यांच्या इंटर्नशिपसाठी निवड करण्यात आली होती. त्यासाठी तिला मासिक 1 लाख रुपये एवढी शिष्यवृत्तीही देण्यात आली होती.

अधिक वाचा  अरविंद केजरीवाल यांना आज दिलासा मिळेल? दिल्ली हायकोर्टात ईडीच्या अटकेविरोधात आज सुनावणी

यानंतर अमृतानं कधी मागं वळून पाहिलंच नाही. तिने कठोर मेहनत घेत इंटर्नशिपमध्ये आपल्या गुणवत्तेची झलक दाखवली. इंटर्नशिप दरम्यान घेण्यात आलेल्या विविध चाचण्यांत उत्तम कामगिरी केल्यानं अ‍ॅडोब कंपनीनं अमृताला प्री प्लेसमेंटद्वारे नोकरीची संधी दिली आहे. त्यासाठी 41 लाखांचं पॅकेज दिलं आहे. ही प्लेसमेंट देशपातळीवर मानाची प्लेसमेंट मानली जाते. यावेळी दिव्य मराठीनं तिच्याशी बातचित केली असता, तिला भविष्यात देशाच्या आयटी आणि संगणकशास्त्र क्षेत्रात योगदान देण्याचं स्वप्न असल्याचं सांगितलं आहे.