पुणे: केंद्रीय सुक्ष्म, लघु, उद्योग मंत्री नारायण राणे यांना अटक करण्यात आल्यानंतर भाजपनेही आता दंड थोपटले आहेत. या अटकेच्या निषेधार्थ संपूर्ण राज्यात निदर्शने करण्यात येणार असल्याची घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. त्यामुळे उद्या बुधवारी संपूर्ण राज्यात राणेंच्या अटकेचे पडसाद उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

चंद्रकांत पाटील यांनी मीडियाशी संवाद साधताना ही घोषणा केली. कोणतेही अटक वॉरंट नसताना केंद्रीय मंत्र्याला अटक करण्याचा प्रकार देशात पहिल्यांदाच घडला आहे. जनादेशाच्या विरोधात सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडीने सत्तेचा दुरूपयोग करून सूडबुद्धीने मा. राणे यांना अटक केली आहे. भाजपा याचा निषेध करते, असं पाटील म्हणाले.

अधिक वाचा  भारताच्या २५० धावा पूर्ण; श्रेयस आणि जडेजाची शतकी भागीदारी

विशेषाधिकाराचा भंग

राणे हे पक्षासाठी महत्त्वाचे नेते आहेत. त्यांच्या कर्तृत्वामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश केला आहे. राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेला मिळत असलेल्या प्रचंड प्रतिसादामुळे घाबरून आघाडी सरकारने कारवाई केली आहे. त्यासाठी बळाचा वापर करा, असे पालकमंत्री सांगत असल्याचेही वाहिन्यांवरून स्पष्ट झाले आहे. राणे यांच्या सुटकेसाठी भाजपा सर्व ते प्रयत्न करेल. या बाबतीत न्यायालय योग्य तो आदेश देईल, असा विश्वास आहे. खासदार म्हणून त्यांना असलेल्या विशेषाधिकारांचा भंग झाल्यामुळे संसदेत संबंधितांकडेही भाजपाच्या खासदारांकडून तक्रार करण्यात येईल, असंही त्यांनी सांगितलं.

अधिक वाचा  इतिहासातील सर्वांत मोठी 41 टक्के वाढ; विलीनीकरणावर कर्मचारी ठाम

गुन्हा दाखल करणे योग्य नाही

राणेंनी काही बोलल्यानंतर त्याला विरोधक उत्तर देऊ शकतात. परंतु, एखाद्या वाक्याच्या आधारे केंद्रीय कॅबिनेट मंत्र्याला थेट अटक करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे या राज्य सरकारच्या कायद्याच्या ज्ञानाबद्दलच शंका निर्माण करणारे आहे. महाविकास आघाडी सरकारने सातत्याने न्यायालयाकडून थपडा खाल्या आहेत, तशा या प्रकरणातही बसतील. राणेसाहेबांची एक बोलण्याची शैली आहे, हे ध्यानात घेतले पाहिजे. एखाद्या नेत्याने काही विधान केले तर त्याला उत्तर देण्याचा प्रघात आहे. लगेच गुन्हा दाखल करणे योग्य नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पंतप्रधानांना जाहीर सभेत चोर म्हणाले होते किंवा त्यांनी पक्षाच्या दसरा मेळाव्यात राज्यपालांवर खालच्या स्तरावर जाऊन टीका केली होती. हे असे विषय काढले तर किती खटले दाखल करावे लागतील, याचा विचार करावा, असा इशाराही त्यांनी दिला.

अधिक वाचा  माझ्या पराभवात 'यांचा' हात ; शशिकांत शिंदे यांचा मोठा आरोप

तर प्रतिक्रिया काय उमटेल याचा विचार करा

भाजपाच्या नाशिकमधील कार्यालयावर झालेला हल्ला भ्याडपणाचा आहे. शब्दांची लढाई शब्दांनीच करावी. असे लांबून दगड मारणे भ्याडपणा आहे. राज्यात शिवसेनेच्या महाविकास आघाडी सरकारचे राज्य आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचे रक्षण करणे ही त्यांची जबाबदारी आहे. अशा प्रकारे शिवसेनेचे कार्यकर्ते भाजपाच्या कार्यालयावर दगडफेक करणार असतील तर त्याची प्रतिक्रिया काय उमटेल याचा विचार करा, असा इशाराही त्यांनी दिला.