पुणे: केंद्रीय मंत्री नारायण राणे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे पुण्यासह राज्यभरातील शिवसैनिक प्रचंड संतापले आहेत. या शिवसैनिकांनी पुण्यात जोरदार निदर्शने केली. यावेळी डेक्कन जिमखाना परिसरात असलेल्या नारायण राणे यांच्या आर. डेक्कन मॉलवर शिवसैनिकांकडून दगडफेक करण्यात आली. मॉलच्या मागच्या भागातील काचा दगडफेक करुन फोडण्यात आल्या.

तत्पूर्वी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालयात कोंबड्या सोडल्या. तसेच ‘नारायण राणे चोर है’, अशी घोषणाबाजी करण्यात आली. महिला शिवसैनिकांनी नारायण राणे यांच्या पोस्टरला जोडे मारले. नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांची माफी मागावी. अन्यथा नारायण राणे यांना पुण्यात फिरू देणार नाही, असे महिला शिवसैनिकांनी सांगितले.

अधिक वाचा  कोणत्याही निवडणुका OBC आरक्षणाशिवाय होऊ नयेत: पटोले

नारायण राणेंच्या पुतळ्याची गाढवावरून धिंड

रायगड परिसरातही शिवसैनिकांकडून नारायण राणे यांच्याविरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली. महाडमधील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी नारायण राणे यांच्या पुतळ्याची गाढवावरून धिंड काढली. त्यांच्या पुतळ्याला चपलांचा हार घालण्यात आला. तसेच शिवसैनिकांकडून मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक रोखून धरण्यात आली.

शिवसैनिक म्हणून रिअ‍ॅक्शन, शासन म्हणून कायद्याने कारवाई : गृहराज्य मंत्री

नारायण राणेंनी आपलं वक्तव्य मागे घ्यावं, ही अ‍ॅक्शनला रिअॅक्शन आहे, नारायण राणेंनी सुरुवात केलीय, बेजबाबदार वक्तव्याचे परिणाम येणारच, आम्ही शासन म्हणून कायदा अबाधित राखण्याचं काम आम्ही करु, पण कायदा बिघडवायची सुरुवात कोणी केली, कोण जबाबदार आहे हे निश्चित बघू, कायद्याप्रमाणे कारवाई करु, जनतेचा उद्रेक वाढला तर त्याला केवळ आणि केवल नारायण राणे हे जबाबदार आहेत, असं गृहराज्य मंत्री आणि शिवसेना नेते शंभूराज देसाई यांनी सांगितलं.