पुणे -राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) एकाच तुकडीचे प्रशिक्षणार्थी (कोर्समेट) असणाऱ्या लष्करप्रमुख जनरल एम. एम. नरवणे, नौदलप्रमुख ऍडमिरल करमबीरसिंह आणि हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल राकेशकुमार सिंह भदौरिया यांनी शनिवारी (दि.21) प्रबोधिनीला भेट दिली. यावेळी त्यांनी प्रशिक्षण सुविधा आणि पायाभूत सुविधांचा आढावा घेतला.

लष्करप्रमुख जनरल नरवणे, नौदल प्रमुख ऍडमिरल सिंह आणि हवाईदल प्रमुख एअरचिफ मार्शल भदौरिया हे प्रबोधिनीच्या 56 व्या तुकडीचे विद्यार्थी आहेत. या भेटीदरम्यान, तिन्ही प्रमुखांनी प्रबोधिनीतील ‘हट ऑफ रिमेम्बरेन्स’ येथे देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या सैनिकांना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर त्यांच्या पालक स्क्वॉड्रन ‘हंटर’ (नौदल प्रमुख) आणि ‘लिमा’ (लष्कर आणि हवाई प्रमुख) यांनाही भेट दिली.

अधिक वाचा  राज ठाकरेंच्या घरी भाजप-मनसे युतीवर चर्चा? फडणवीसांचे पहिल्यांदाच सविस्तर उत्तर

यावेळी संबंधित पथकांच्या कॅडेट्‌सशी संवाद साधला. भेटीच्या अखेरीस एनडीएचे प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. या ऐतिहासिक प्रसंगी तीन प्रमुखांच्या वतीने बोलताना नौदलप्रमुखांनी आधुनिक युद्धपद्धतीवर लक्ष केंद्रित करत, सैन्य दलाने मूलभूत सिद्धांत आणि नेतृत्वगुण आत्मसात करण्यासाठी प्रशिक्षणार्थींना प्रोत्साहन दिले.

भेटीचे महत्त्व

एनडीएमध्ये मुलींना प्रवेश देण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच केलेल्या वक्‍तव्यानंतर तिन्ही सैन्यदल प्रमुखांनी एकत्रितपणे प्रबोधिनीला दिलेल्या भेटील विशेष महत्त्व दिले जात आहे. यामुळे आगामी काळात एनडीएमध्ये मुलींना प्रवेश देण्याच्या दृष्टीने सकारात्मक विचारासोबतच याबाबतच्या कामांना गती मिळण्याची शक्‍यता असल्याचे मत संरक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्‍त केले जात आहे.