भाजपने पुणे महापालिकेच्या 270 ॲमेनिटी स्पेस Open Space भाड्याने देण्याचा प्रस्ताव मुख्य सभेसमोर आणला असला तरी त्यास सर्व पक्षांचा विरोध होत आहे. त्यातच आता ॲमेनिटी स्पेस चा विषय शहराच्या हिताचा नसेल तर त्यास विरोध करा, भाजपने बहुमताच्या जोरावर विषय मंजूर केला तर त्यात राज्यसरकार हस्तक्षेप करेल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत स्पष्ट केले.

अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांची बैठक शासकीय विश्रामगृह येथे घेतली. या बैठकीत आगामी निवडणूक, पक्षाचे संघटना, शहराचा विकास या अनुषंगाने चर्चा झाली. या बैठकीत ॲमेनिटी स्पेसचा मुद्दा देखील उपस्थित झाला. या प्रस्तावास राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा द्यावा यासाठी भाजपने प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी पक्षाच्या नेत्यांच्या गाठीभेटी सुरू केले आहेत. त्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी पदाधिकाऱ्यांना सूचना केली.

अधिक वाचा  "महाराष्ट्रातही आमचे मतभेद आहेत तरीही..."यूपीएच्या नेतृत्वावरुन संजय राऊतांनी ममतांना दिला सल्ला

ॲमेनिटी स्पेस ३० वर्ष भाड्याने देऊन त्यामधून महापालिकेला उत्पन्न मिळणार असले तरी यातून नागरिकांच्या हिताचा विचार करावा, यामध्ये पुणेकरांपेक्षा जागा घेणाऱ्यांनाच जास्त फायदा होणार असेल तर त्याचा विरोध झाला पाहिजे. ॲमिनीटी स्पेसच्या या प्रस्तावाबाबत शहरातील दोन्ही आमदार, माजी महापौर, माजी नगरसेवक यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी चर्चा करून शहराच्या हिताचा निर्णय घ्यावा. तुमच्या भूमिकेच्या विरोधात भाजपने बहुमतावर विषय मंजूर केला तर राज्य सरकार त्यात हस्तक्षेप करेल, असे पवार यांनी बैठकीत सांगितले.