मेरठ: जवानांच्या रक्षणासाठी ‘हायटेक बुलेटप्रूफ जॅकेट’ची निर्मिती करण्यात आली आहे. ही प्रायोगिक तत्वावर केलेली निर्मिती आहे. उत्तर प्रदेशच्या मेरठमधील एमआयईटी इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी अटल कम्युनिकेशन इनोव्हेशन सेंटरमध्ये या जॅकेटची निर्मिती केली आहे. कॉलेजमधील इंजिनिअरिंगच्या शिक्षणादरम्यान निर्माण झालेल्या धातूच्या कचऱ्याचा सुयोग्य पद्धतीने पुनर्वापर करुन जॅकेटची निर्मिती करण्यात आली आहे.

‘हायटेक बुलेटप्रूफ जॅकेट’मधील एका उपकरणामुळे जवानाची भौगोलिक स्थिती कायम नियंत्रण कक्षाला कळत राहते. तसेच जवानाचे शत्रूच्या गोळीबारापासून संरक्षण होते. विशेष म्हणजे बुलेटप्रूफ जॅकेटमध्ये अकरा मिलिमिटरची दोन बॅरलची गन आहे. या गनच्या मदतीने दोनशे मीटरपर्यंत झटपट गोळीबार करणे शक्य आहे. यामुळे हातघाईच्या लढाईची वेळ आली तरी जवान शत्रूवर सहज वर्चस्व मिळवू शकतो.

अधिक वाचा  omicron Virus ची 23 देशांत धडक, WHO चा गंभीर इशारा

जॅकेटमध्ये वायरलेस ट्रिगर आहे. या ट्रिगरच्या मदतीने काही किलोमीटर अंतरावर विशिष्ट गन सेट करुन ठेवणे शक्य आहे. यामुळे जवान स्वतःला सुरक्षित ठेवून गोळीबार करू शकेल; असे जॅकेट तयार करणाऱ्या विद्यार्थ्यांनी सांगितले. लष्करी अधिकाऱ्यांसमोर सादरीकरण करुन जॅकेट आणखी सक्षम करण्याची विद्यार्थ्यांची योजना आहे.