स्थायी समितीचे लाच प्रकरण उघड झाल्यानंतर तिसऱ्या दिवशीही याच विषयावरून पिंपरी पालिकेतील वातावरण ढवळून निघाले. खासदार श्रीरंग बारणे यांच्या नेतृत्वाखाली पालिका मुख्यालयात शिवसैनिकांनी तीव्र निदर्शने केली. पिंपरी पालिका लुटारूंच्या ताब्यात आहे, असा आरोप बारणे यांनी केला. शहरातील विविध संस्था, संघटनांनी याच मुद्दय़ावरून प्रवेशद्वारासमोर धरणे आंदोलन केले.

ऑगस्ट महिन्याची सर्वसाधारण सभा शुक्रवारी होती, त्याचे औचित्य साधून शिवसेनेने आंदोलन केले. खासदार बारणे, सहसंपर्कप्रमुख योगेश बाबर, शहरप्रमुख सचिन भोसले यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक सहभागी झाले होते. भाजपच्या भ्रष्ट कारभाराविरोधात शिवसेनेने घोषणाबाजी केली. महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन देण्यात आले.

अधिक वाचा  "महाराष्ट्रातही आमचे मतभेद आहेत तरीही..."यूपीएच्या नेतृत्वावरुन संजय राऊतांनी ममतांना दिला सल्ला

बारणे म्हणाले की, पालिकेला भ्रष्टाचाराच्या खाईत लोटणाऱ्या भाजपमध्ये लुटारूंची टोळी कार्यरत आहे. महापालिकेचे पदाधिकारी, अधिकारी हेच ठेकेदार बनले आहेत. दुसऱ्याच्या नावाने निविदा भरून पालिका लुटण्याचा एककलमी कार्यक्रम सध्या सुरू आहे. दरम्यान, लाचखोर प्रकरणाचा निषेध आणि ‘पे अँड पार्क’ला विरोध करण्यासाठी शहरातील विविध संस्था, संघटनांनी एकत्रितपणे आंदोलन केले. मानव कांबळे, मारुती भापकर, देवेंद्र तायडे, सिध्दीक शेख, आनंदा कुदळे, विशाल जाधव, धम्मराज साळवे, सुरेश गायकवाड, सतीश काळे आदींचा सहभाग होता. २०१७ पासून सर्व स्थायी समिती अध्यक्षांच्या काळातील कारभाराची सखोल चौकशी करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली.

अधिक वाचा  बार्बाडोस प्रजासत्ताक; ब्रिटनच्या राणीचा ४०० वर्षांचा अंमल संपला

निरीक्षकांची पदाधिकाऱ्यांसमवेत चर्चा

लाच प्रकरणाच्या चौकशीसाठी भाजपने आमदार माधुरी मिसाळ यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली. त्यांनी शुक्रवारी महापौर माई ढोरे, आमदार लक्ष्मण जगताप, पक्षनेते नामदेव ढाके आदींची भेट घेऊन चर्चा केली. बाहेरगावी असलेल्या शहराध्यक्ष महेश लांडगे यांच्याशी त्यांनी दूरध्वनीवरून चर्चा केली. या बाबतचा अहवाल प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना देणार असल्याचे मिसाळ यांनी सांगितले.