पुणे: “जात ही गोष्ट आपल्याकडे शतकांपासून आहे. राष्ट्रवादी पक्षाच्या जन्मानंतर दुसऱ्या जातीबद्दलचा द्वेष निर्माण झाला. सर्वांना ही बाब माहिती आहे. असे असताना राज यांनी प्रबोधनकार ठाकरे वाचावेत असे शरद पवार का म्हणाले हेच मला समजलं नाही. मी प्रबोधनकारही वाचलेत आणि यशवंतराव चव्हाणही वाचले आहेत. माझ्या आजोबांनी लिहिलेल्या पुस्तकाचा पवार आणि राष्ट्रवादीबद्दल मी जे बोललो त्याच्याशी काहीच संबंध नाही. मला या सरकारला सांगायचं आहे की जातीपातीचे राजकारण करू नका. मराठ्यांना आरक्षण देणार नसाल तर स्पष्ट सांगा. उगाच माथी भडकवू नका”, अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपले मत मांडले. ते पुण्यात बोलत होते.

अधिक वाचा  भारत - दक्षिण आफ्रिका दौऱ्यासंदर्भात BCCI कडून आली मोठी अपडेट

“जातीपातीच्या मुद्द्यातून महाराष्ट्राने बाहेर येणं गरजेचं आहे. गेल्या १५-२० वर्षांपासून मित्रांमध्ये, शाळा-कॉलेजेसमध्येही जातीपातीचे विचार आले. पत्रकारांमध्येही हल्ली जात डोकावत आहे. ज्या महाराष्ट्राने देशाला विचार दिला, त्या महाराष्ट्राची अशी अवस्था चिंताजनक आहे. मराठा बंधू-भगिनींनी मोर्चे काढले, आंदोलने केली. पण हे मोर्चे कशातून निघाले? कले निघाले? जर त्यांना आरक्षण मिळणार नसेल तर त्यांना तसं स्पष्ट सांगा. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर लोकांची माथी भडकवून केवळ या निवडणुकीला मत मिळतील. पण पुढे परिस्थिती गंभीर आहे”, अशी रोखठोक मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितले.