पुणे – महापालिकेच्या ताब्यात असलेल्या ऍमेनिटी स्पेस (सुविधा क्षेत्र) स्वतंत्र निविदा प्रक्रिया राबवून 90 वर्षांच्या मुदतीच्या कराराने खासगी विकसकांना विकसित करण्यासाठी देण्याच्या प्रस्तावास स्थायी समितीने मान्यता दिली. त्यामुळे 30 वर्षांच्या पहिल्या टप्प्यातील भाडेकरारानुसार महापालिकेला 1,753 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळू शकेल, अशी माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी पत्रकार परिषदेत दिली.

185 सर्वसाधारण ऍमेनिटी स्पेस 19 विविध प्रकारे विकसित करून 30 वर्षांच्या भाडेकराराने देऊन 753 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळू शकेल. 85 आरक्षित जागांवर आहे त्याच आरक्षणानुसार विकसित केल्यास 30 वर्षांत सुमारे एक हजार कोटी रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे. अशाप्रकारे एकूण 270 ऍमेनिटी स्पेस भाडेतत्वावर देऊन 1,753 कोटी रुपयांच्या उत्पन्नाचा अंदाज रासने यांनी मांडला. दरम्यान, या प्रस्तावास महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी विरोध केल्याने त्यावर मतदान घेण्यात आले. यावेळी 10 विरोधात 6 मतांनी तो मंजूर करण्यात आला.

अधिक वाचा  ‘बिग बॉस’ फेम मुनव्वर फारुकी पोलिसांच्या ताब्यात, हुक्का पार्लरमध्ये रेडदरम्यान कारवाई

ऍमेनिटी स्पेस दीर्घ मुदतीने भाडेतत्त्वावर देण्यात याव्यात, असा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने तयार केला होता. करोनाच्या काळात तो मागे पडला होता. शहर सुधारणा समितीने नुकतीच या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. भाडेतत्त्वावर दिलेली जागा पाच वर्षांच्या कालावधीत निर्धारित केलेल्या सुविधेसाठी विकसित करणे बंधनकारक करण्यात येणार आहे. या प्रस्तावाला मुख्यसभेनंतर राज्य सरकारची मान्यता घेण्यात येणार आहे.