कोरोना व्हायरसच्या तिसऱ्या लाटेपूर्वी भारतासाठी आनंदाची बातमी आली आहे. भारतातच लवकरच लहान मुलांच्या लसीकरणाला सुरुवात होऊ शकते. आयसीएमआर-एनआयवीच्या संचालिका प्रिया अब्राहम यांनी २ ते १८ वयोगटातील लहान मुलांच्या कोव्हॅक्सिन फेज २ आणि फेज ३ ची चाचणी झाली असून भारतात सप्टेंबर महिन्यापर्यंत लहान मुलांसाठी स्वदेशी कोरोना लस येऊ शकते असं म्हटलं आहे.

प्रिया अब्राहम यांनी एका चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत म्हटलंय की, अपेक्षा आहे की या चाचणीचे निष्कर्ष लवकरच उपलब्ध होतील. त्यानंतर नियामक आयोगाला पुढील परवानगीसाठी पाठवण्यात येईल. सप्टेंबर किंवा त्याच्या पुढील महिन्यापर्यंत लहान मुलांना कोविड १९ लस उपलब्ध होऊ शकते. आयसीएमआर आणि हैदराबाद येथील लस उत्पादक कंपनी भारत बायोटेक लहान मुलांसाठी पहिली स्वदेशी कोविड १९ लस बनवत आहेत.

अधिक वाचा  न्यूझीलंडचा पहिला डाव 62 धावांतच आटोपला; फिरकीसमोर घसरगुंडी

ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात Covovax येणार

अलीकडेच काही दिवसांपूर्वी सीरम इंन्सिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदार पूनावाला यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या मुलाखतीनंतर अदार पूनावाला यांनी म्हटलं की, सीरमची ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत भारतात लॉन्च होणार आहे. ही लस १२ वर्षावरील मुलांसाठी असेल. तसेच पुढील २०२२ च्या पहिल्या तिमाहीमध्ये १२ वर्षांपेक्षा कमी वयातील मुलांसाठी लस लॉन्च होईल. भारत सरकार पूर्ण सहकार्य करत असून कुठेही आर्थिक तुटीची शक्यता नाही असं त्यांनी सांगितले होते.

तर लसीच्या वाटपावरुन सांगितले की, आम्ही १३ कोटी कोविड लसी प्रत्येक महिन्याला देत आहोत. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने २ ते १७ वर्षापर्यंत मुलांवर कोवोवॅक्स लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी काही अटींसह परवानगी देण्याची शिफारस केली आहे. माहितीनुसार चाचणीत १० ठिकाणी २९० लहान मुलांचा समावेश करण्यात येईल. ज्यात १२ ते १७ वयोगटातील आणि आणि २ ते ११ वयोगटातील प्रत्येकी ४६० विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात येणार आहे.

अधिक वाचा  CNG चे दर २ महिन्यांत ३री वाढ; १४ रुपयांनी वर्षभरात वाढले दर !

ऑक्टोबरपासून लहान मुलांचे लसीकरण सुरु

सध्या १८ वर्षावरील लोकांच्या लसीकरणाचा कार्यक्रम सुरु आहे. लहान मुलं कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत जास्त संक्रमित होण्याचा धोका आहे. त्यामुळे जगभरात लहान मुलांसाठी लसीची चाचणी घेतली जात आहे. अमेरिकेत फायजर कंपनीने १२ वर्षावरील मुलांसाठी लसीची चाचणी सुरु केली आहे. भारतात बायोटेक कंपनीची कोव्हॅक्सिनची लहान मुलांवर चाचणी सुरु आहे. या चाचणीचे सकारात्मक निष्कर्ष समोर येत आहेत. तिसऱ्या लाटेचा परिणाम लहान मुलांवर होऊ नये यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. लहान मुलांसाठी लस लवकरात लवकर आणण्यासाठी युद्धास्तरावर प्रयत्न सुरु आहेत. लस आल्यानंतर त्याचे उत्पादन आणि वितरण जास्तीत जास्त कसं केले जाईल याबाबत वेगाने योजनांची तयारी केली जात आहे.