नवी दिल्ली: तालिबानने अफगाणिस्तावर पूर्ण ताबा मिळवल्यानंतर आता तेथे सत्ता स्थापन करण्यास सुरुवात झाली आहे. अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांनी पळ काढल्यानंतर तालिबानने सरकार स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू केली असून, एका पत्रकार परिषेदला संबोधित करून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. भारताच्या भूमिकेकडे आता लक्ष लागले आहे. यातच भारतातून होणारी आयात-निर्यात तालिबानने थांबवली आहे. फेडरेशन ऑफ इंडिया एक्सपोर्ट ऑर्गनायझेशनचे डॉ. अजय सहाय यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

तालिबानने आताच्या घडीला आयात-निर्यात रोखली आहे. भारतातून अफगाणिस्तान होणारी आयात-निर्यात पाकिस्तानातून होत असते. मात्र, अफगाणिस्तावरील ताबा आणि आताची परिस्थिती यानंतर तालिबानने हा मार्ग बंद केला आहे. अफगाणिस्तानवरील सर्व परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवले जात आहे. लवकरच आयात-निर्यात सुरू करण्यावर भर दिला जाईल, असे डॉ. अजय सहाय यांनी एएनआयशी बोलताना सांगितले.

अधिक वाचा  हिवाळी अधिवेशन: १२ खासदारांचे निलंबन; काँग्रेस ५, तृणमूल आणि शिवसेनेच्या २ खासदारांचा समावेश

भारत आणि अफगाणिस्तानमधील आयात-निर्यात

डॉ. अजय सहाय यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत हा अफगाणिस्तानचा मोठा भागीदार आहे. सन २०२१ मध्ये भारतातून अफगाणिस्तानमध्ये ८३५ मिलियन डॉलरची निर्यात करण्यात आली. तर, अफगाणिस्तानमधून भारतात ५१० मिलियन डॉलरची आयात करण्यात आली आहे. एवढेच नव्हे तर भारताने मोठ्या प्रमाणात अफगाणिस्तानात गुंतवणूक केली आहे. यामध्ये ४०० प्रकल्पांचा समावेश असल्याचे आहे. काही गोष्टी आंततरराष्ट्रीय उत्तर-दक्षिण मार्गे निर्यात होत असून त्या सुरळीत आहेत. दुबईमार्गे होणारी आयातही सध्या सुरळीत आहे. भारतातून होणाऱ्या निर्यातीमध्ये चहा, कॉफी, साखर, औषधे, मसाले यांची समावेश असून, आयातीमध्ये जास्त करून ड्राय फ्रूट्सचा समावेश आहे.

अधिक वाचा  राज ठाकरेंच्या घरी भाजप-मनसे युतीवर चर्चा? फडणवीसांचे पहिल्यांदाच सविस्तर उत्तर

दरम्यान, अफगाणिस्तानातील अस्थिरतेमुळे पुरवठा साखळी विस्कळीत होण्याची दाट शक्यता असल्याने भारतात सुकामेवा महागण्याचे संकेत आहेत. त्यामुळे सुकामेव्याच्या मिठायांच्या किमतीही वाढणार आहेत. अफगाणिस्तानातून प्रामुख्याने जर्दाळू, अंजीर, छोटे पिस्ते आणि अक्रोडचा पुरवठा भारतासह इतर देशांना होतो. ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये नवे पीक हाती येते. त्यावेळी भारतासह जगभरातील बाजारपेठांमध्ये सुकामेव्याची खरेदी होते. मात्र, सध्या अफगाणिस्तानातील अस्थिरतेमुळे सुकामेव्याच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची चिन्हे आहेत.