पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीच्या प्रारुप विकास आराखड्यावर हरकती व सूचना नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. यात सुमारे 731 गावांचा समावेश होत असून हरकती नोंदवण्यासाठी नागरिकांना औंध येथील कार्यालयात यावे लागत होते. मात्र, आता प्राधिकरणाने औंधसह आणखी चार ठिकाणी हरकती स्वीकारण्याची व्यवस्था केली आहे.

प्रारुप विकास आराखड्यातील गावनिहाय नकाशे प्राधिकरणाच्या औंध कार्यालय आणि संकेतस्थळावर प्रसिद्ध झाले आहेत. त्यावर नागरिक हरकती नोंदवत आहेत. त्याचबरोबर या ई-मेलवर हरकती पाठवता येणार आहेत. ज्यांना प्रत्यक्ष हरकत नोंदवायची आहे, अशांना प्राधिकरणाच्या औंध कार्यालयात यावे लागते. त्यामुळे तेथे गर्दी होत आहे. या पार्श्‍वभूमीवर पीएमआरडीएने एकूण पाच ठिकाणी हरकती स्वीकारण्याची व्यवस्था केली आहे.

अधिक वाचा  महापालिका प्रचाराचा मेट्रो उद्घाटनाने प्रारंभ; पंतप्रधान मोदी यांच्या हस्तेचे नियोजन

याविषयी पीएमआरडीएचे आयुक्त डॉ. सुहास दिवसे म्हणाले, ‘नागरिकांच्या सोयीसाठी नव्याने चार कार्यालयांत हरकती स्वीकरण्याची सोय केली आहे. त्यामुळे नागरिकांना जवळच्या क्षेत्रीय कार्यालयात हरकती, सूचना देता येतील.’

अर्जदारांना सूचना
‘पीएमआरडीए’च्या प्रारुप विकास योजनेसंबंधी हरकत घेण्यासाठी भाग नकाशाची (झोन दाखला) आवश्‍यकता नसून अर्जदार यांनी अर्जात संबंधित गाव व गट नंबरचा उल्लेख करावा,’ असे आवाहन आयुक्त डॉ. सुहास दिवसे यांनी केले आहे.

या ठिकाणी हरकत नोंदवता येणार
पीएमआरडीए कार्यालय, औंध
पीएमआरडीए कार्यालय, आकुर्डी (नवीन प्रशासकीय इमारत पिंपरी-चिंचवड प्राधिकरण)
वाघोली क्षेत्रीय कार्यालय (वाघोली ग्रामपंचायतीमागे)
नसरापूर क्षेत्रीय कार्यालय (नसरापूर तलाठी कार्यालयाशेजारी)
वडगाव मावळ क्षेत्रीय कार्यालय (जुनी पंचायत समिती)