कात्रज बसस्टॉप ते दत्तनगर चौक रस्त्याची खड्ड्यांमुळे अक्षरश: चाळण झाली आहे. ड्रेनेजवरील झाकणेदेखील खड्ड्यात गेल्यामुळे अपघात घडत आहेत. यात अनेकजण आतापर्यंत किरकोळ जखमी झाले आहेत. मात्र, या रस्त्याकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत असून खड्डे अजूनही बुजवण्यात आलेले नाहीत. तसेच ड्रेनेज झाकणांची कामेदेखील केलेली नाही.

कात्रज बसस्टॉप ते दत्तनगर चौक हा रस्ता पूर्वीपासूनच अरूंद आहे. तरीही, डम्पर व ट्रक यांसारखी अवजड वाहने येथून रात्रंदिवस जात असल्याने रस्त्याची दुर्दशा झाली आहे. येथील संतोषनगर गल्ली नंबर 4 जवळ उतारावर ड्रेनेजबाजूला खड्डा पडल्याने त्यात रिक्षाचे चाक अडकले. यात मोठा अपघात टळला. यात रिक्षाचालक जखमी झाला आहे. तर रिक्षा खड्ड्यातून बाहेर काढण्यास उशीर झाल्याने रस्त्यावर बराच वेळ कोंडी झाली होती. यात पीएमपीच्या सुमारे 7 ते 8 बसेस अडकल्यात होत्या. त्यामुळे प्रवाशांनाही त्रास सहन करावा लागला.

अधिक वाचा  26/ 11 च्या शहीद शूरवीरांना 180 रक्तदानाचे अभिवादन

दत्तनगर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, आगम मंदिराकडून येणाऱ्या उतारावरील रस्त्यावरून सतत सांडपाणी वाहत असते. अतिक्रमणे झालेली असल्याने रस्ता अरूंद झाला आहे. काही ठिकाणी दुचाकी व ट्रक पार्किंग रस्त्याकडेलाच उभे करण्यात येतात. त्यामुळे या मार्गावर सदैव कोंडी असते. खड्डे व त्यात साचणाऱ्या पाण्यामुळे खंड याचा अंदाज येत नसल्याने अपघात घडत आहेत. या मार्गावरून दत्तनगर, आंबेगाव, जांभुळवाडी, कोळेवाडी, संतोषनगर, सच्चाई माता मंदिर परिसराकडे नागरिक वाहनाद्वारे जात असतात. त्यांनाही येथे मनस्ताप सहन करावा लागतो.

रिक्षाचालकाची गांधीगिरी
मंगळवारी येथे झालेला अपघात हा रस्त्याच्या दुरवस्थेमुळे झाला आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी चालकाने आपला रिक्षा खड्ड्यात म्हणजेच अपघातस्थळीच सोडून उपचाराकरता निघून गेला. किमान या पर्यायाने तरी मनपा आणि पोलिसांचे या रस्त्याकडे लक्ष जाईल, या विचारानेच रिक्षाचालकाने असे केल्याचे स्थानिकांनी सांगितले. तर, या रस्त्यावर वाहतूक कोंडी झालेली असतानाही वाहतूक पोलीस मात्र फिरकले नव्हते.