पिंपरी-चिंचवड महापालिकेतील स्थायी समितीच्या कार्यालयावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करत बुधवारी 1 लाख 18 हजारांची लाच स्वीकारल्या प्रकरणी पाच जणांवर कारवाई केली. थेट स्थायी समितीच्या अध्यक्षांवरच गुन्हा दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडालीआहे . पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या जागेमध्ये होर्डिंग उभारण्यासाठी निविदा काढण्यात आली होती. यातील 28 कामे ही तक्रारदाराला मिळाली होती.

या कामाचा कार्यारंभ आदेश (वर्क ऑर्डर) देण्यासाठी स्थायी समितीचे अध्यक्ष ऍड. नितीन लांडगे व त्यांचे स्वीय सहायक ज्ञानेश्‍वर पिंगळे यांनी संबंधित ठेकेदाराला निविदा रकमेच्या 3 टक्‍केप्रमाणे 10 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती 6 लाख रुपये घेण्याचे मान्य करून त्यापैकी 1 लाख 18 हजारांची रक्‍कम संगणक चालक राजेंद्र शिंदे, लिपिक विजय चावरिया व शिपाई अरविंद कांबळे यांच्यामार्फत आज बुधवारी स्वीकारण्यात आली.

अधिक वाचा  राज्याच्या हवाई निर्बंधांवर केंद्राचा आक्षेप ; नियम सुसंगतीची सूचना

दरम्यान, लाचेची मागणी केल्यानंतर संबंधित ठेकेदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागामध्ये तक्रार नोंदविली होती. या तक्रारीनंतर बुधवारी रक्‍कम देताना महापालिकेत सापळा लावण्यात आला. सायंकाळी पाचच्या सुमारास महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर संबंधित ठेकेदाराकडून 1 लाख 18 हजारांची रक्‍कम स्वीकारण्यात आली.

रक्‍कम स्वीकारल्यानंतर तत्काळ त्यांना ताब्यात घेण्यात आले. यानंतर स्थायी समितीच्या तिसऱ्या मजल्यावरील कार्यालयात सर्वांची तब्बल अडीच तास चौकशी करण्यात आली. यानंतर सभापती ऍड. नितीन लांडगे यांच्यासह ज्ञानेश्‍वर पिंगळे, विजय चावरिया, राजेंद्र शिंदे व अरविंद कांबळे यांना सातच्या सुमारास ताब्यात घेण्यात आले. या सर्वांची पुण्यातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात कसून चौकशी करण्यात आली. चौकशीअंती या पाचही जणांवर भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम कलम – 7, 7 अ आणि 12 अन्वये पिंपरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

अधिक वाचा  'स्वच्छ'ला काम मिळताच साहित्य खरेदीही सुरू

पहिलीच कारवाई
पिंपरी-चिंचवड महापालिकेत आतापर्यंत अधिकारी लाच घेताना सापडल्याची अनेक उदाहरणे असली तरी स्थायी समितीवर झालेली इतिहासातील ही पहिलीच कारवाई आहे. आजच्या धडक कारवाईमुळे महापालिकेसह राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.