वॉशिंग्टन: अफगाणिस्तानवर कब्जा करणाऱ्या तालिबानला अमेरिकेला पहिला मोठा झटका दिला आहे. अमेरिकन सैन्य अफगाणिस्तानातून मायदेशी परतल्यानंतर तालिबाननं डोकं वर काढलं. एका पाठोपाठ एक प्रांत काबीज करत तालिबाननं संपूर्ण देश आपल्या अंमलाखाली आणला. तालिबानच्या दहशतवादी कारवायांमुळे संपूर्ण जगात चिंतेचं वातावरण आहे. तालिबानमधील लाखो लोकांना देश सोडायचा आहे. अनेकांकडून त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तालिबाननं युद्ध संपल्याची घोषणा केली आहे. त्यातच आता अमेरिकेनं तालिबानला मोठा धक्का दिला आहे.

अमेरिकेच्या बँकांमध्ये असणारी अफगाण सरकारची खाती सील करण्यात आली आहेत. राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन यांनी हा निर्णय घेतला. अमेरिकेतल्या बँकांमध्ये अफगाण सरकारचे कोट्यवधी डॉलर आहेत. ही रक्कम तालिबानच्या हाती पडू नये यासाठी अमेरिकन सरकारनं हा निर्णय घेतला आहे. जगातील गरीब देशांपैकी एक असलेला अफगाणिस्तान बऱ्याच प्रमाणात अमेरिकेच्या मदतीवर अवलंबून होता. त्यातच आता अफगाण सरकारची खाती अमेरिकेनं सील केली आहेत.

अधिक वाचा  ‘बिग बॉस’ फेम मुनव्वर फारुकी पोलिसांच्या ताब्यात, हुक्का पार्लरमध्ये रेडदरम्यान कारवाई

वॉशिंग्टन पोस्टनं दिलेल्या वृत्तानुसार, बायडन प्रशासनानं गेल्या रविवारी अमेरिकन बँकांमध्ये असलेली अफगाण सरकारची खाती गोठवली. ट्रेझरी सेक्रेटरी जेनेट एल. येलन आणि ऑफिसर ऑफ फॉरेन असेट्स कंट्रोलच्या ट्रेझरी विभागाच्या अधिकाऱ्यांना हा निर्णय घेतला. अफगाण सरकारची केंद्रीय बँक संपत्ती तालिबानला देण्यात येणार नसल्याची घोषणा अमेरिकेकडून करण्यात आली आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडन यांनी सोमवारी अफगाणिस्तान प्रश्नावर भाषण केलं. त्यावेळी त्यांनी अफगाणिस्तानला मिळणारी मदत सुरू ठेवण्याचा शब्द दिला. ‘आम्ही अफगाणी नागरिकांच्या पाठिशी आहोत. आम्ही आमचा आंतरराष्ट्रीय प्रभाव आणि मानवीय सहायतेच्या दृष्टीकोनातून नेतृत्त्व करू,’ असं बायडन म्हणाले होते. अफगाण सरकारची बँक खाती सील करण्याच्या प्रक्रियेवर अद्याप तरी व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.