काबुल – नव्याने सत्तेवर आलेल्या तालिबानने अफगाणिस्तानचा राष्ट्रध्वज कायम ठेवावा या मागणीसाठी अफगाणिस्तानमधील कुनार प्रांतातील युवकांनी एक अभियान सुरू केले आहे. यासंदर्भात सोशल मीडियावर एक व्यापक अभियान सुरू करण्यात आले आहे. अफगाणिस्तान इस्लामिक अमिरातीचा राष्ट्रध्वज कायम ठेवण्यात यावा, असे एका गटाचे म्हणणे आहे. तर देशाला एक संयुक्त ध्वज असावा, असे आणखीन एका गटाचे म्हणणे आहे.

दरम्यान अफगाणिस्तानच्या नव्या सरकारमध्ये महिलांना सहभागी करून घेण्यात यावे या मागणीसाठी महिलांच्या एका गटानेही मागणी केली आहे. या महिलांनी थेट तालिबानशी संपर्क केलेला नाही. मात्र महिलांच्या एखाद्या संघटनेने अफगाणिस्तानमध्ये आपल्या मागण्या मांडण्याची ही पहिलीच वेळ आहे.

अधिक वाचा  महापालिका प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा राज्य निवडणूक आयोगाला सादर

तालिबानी राजववटीत हातात शस्त्र घेउन उघडपणे हिंडणाऱ्यांची संख्या मर्यादित आहे. त्यामुळे आता राजधानी काबुलमधील परिस्थिती सर्वसामान्य व्हायला लागली आहे. काबुलच्या रस्त्यांवर आता नागरिकांची वर्दळ पूर्वीप्रमाणे सुरू झालेली दिसते आहे. मुख्य रस्त्यावरील दुकानेही आता उघडलेली दिसू लागली आहेत. सार्वजनिक वाहतूकही आता सुरळीत हऊ लागली आहे.

देशातील कायदा आणि सुव्यवस्था आटोक्‍यात राखण्यासाठी तालिबानने चोरांचा बंदोबस्त करायला सुरूवात केली आहे. तालिबानी असल्याचे भासवत लुटालूट करणाऱ्या चोरांना अटक केल्याचे व्हिडीओ तालिबानने पोस्ट करायला सुरूवात केली आहे.

अफगाणिस्तानमधील शिक्षणसंस्था आता मुले आणि मुली दोघांसाठीही उघड्या असतील, असेही जाहीर करण्यात आले आहे. सध्या तरी या शिक्षण संस्था बंदच आहेत. तालिबान्यांच्या एका गटाने काबुलमधील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेतील डॉक्‍टर महिलांची भेट घेऊन त्यांना यापुढेही आरोग्यसेवेचे काम सुरू ठेवण्यास सांगितले आहे.

अधिक वाचा  अनिल अंबानी अडचणीत? रिझर्व बँकेने सुरू केली कायदेशीर प्रक्रिया

प्राध्यापिकांना काम करण्याची परवानगी; हेरात विद्यापीठातील महिलांना दिलासा

हेरात विद्यापीठातील महिला प्राध्यापिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना काम करण्याची परवानगी देण्यात आली आहे. शिवाय, विद्यार्थिनींना शिकण्याची मुभा देण्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती विद्यापीठातील सूत्रांनी दिली आहे. सर्वच विद्यापीठांतील विद्यार्थ्यांमध्ये सद्य:स्थितीत प्रचंड तणाव आहे. या पार्श्वभूमीवर कंधार विद्यापीठाप्रमाणे हेरात विद्यापीठात इस्लामिक एमिरेट्सच्या उच्च शिक्षण आयुक्तालयाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रमुख अधिकाऱ्यांशी चर्चा केली. या चर्चेतील समन्वयानंतर झालेल्या निर्णयांची हेरात विद्यापीठाचे प्रमुख डॉ. मोहम्मद दाऊद मुनिर यांनी घोषणा केली.