नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारविरोधात काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्ष अधिक आक्रमक होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. कारण, काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा आणि संयुक्त पुरोगामी आघाडी अर्थात UPA च्या चेअरपर्सन सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली विरोधी पक्षांची बैठक होणार आहे. 20 ऑगस्ट अर्थात येत्या शुक्रवारी संध्याकाळी 4 वाजता ही बैठक होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही बैठकीत दूरदृष्यप्रणाली अर्थात ऑनलाईन माध्यमांद्वारे होणार असल्याची माहिती मिळतेय.

सोनिया गांधी यांनी बोलावलेल्या बैठकीला काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला, शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यासह देशातील विरोधी पक्षाची भूमिका बजावणारे अनेक नेते सहभागी होणार आहेत. देशात मोदी सरकारकडून होत असलेली विरोधी पक्षांची मुस्कटदाबी, तसंच 2024 लोकसभा निवडणुकीची व्युहरचना आणि पर्यायी नेतृत्व यासह अनेक विषयांवर या बैठकीत महत्वपूर्ण चर्चा होणार असल्याची माहिती मिळतेय.

अधिक वाचा  Rakhi sawant: 'माझ्या बॉडीचा हा पार्ट खोटा'; 16 लाख किंमत

उद्धव ठाकरे उपस्थित राहणार!

यापूर्वी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर 10 एप्रिल रोजी सोनिय गांधी यांनी काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली होती. त्या बैठकीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही हजर राहतील अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र, त्या बैठकीत उद्धव ठाकरे सहभागी झाले नव्हते. त्यानंतर 20 ऑगस्ट रोजी होणाऱ्या विरोधी पक्षांच्या बैठकीला मात्र उद्धव ठाकरे उपस्थित राहतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

22 मे 2020 रोजीही सोनिया गांधी यांनी एक ऑनलाईन बैठक घेतली होती. त्या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार, संजय राऊत यांच्यासह 22 पक्षाचे नेते हजर होते असा दावा काँग्रेसनं केला होता. त्या बैठकीबाबत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माहिती दिली होती. या बैठकीत पुढील अॅक्शन प्लॅन काय असावा यासंदर्भात चर्चा झाली. आर्थिक पॅकेज, स्थलांतरांचा, शेतकरी, कामगार यांच्याबाबत चर्चा झाली. बैठकीतील चर्चेतून काही मागण्यांचे पत्रक काढले जाईल, अर्थव्यवस्था चालण्यासाठी विमाने आणि काही ट्रेनही चालल्या पाहिजेत, मुंबईत ऑनलाईन मद्यविक्री हे अर्थव्यवस्था चालवण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल असेल, असं राऊत यांनी सांगितलं होतं.

अधिक वाचा  Omicron Variant ची ही लक्षणं!; डेल्टा पेक्षा ओमायक्रोन हा फरक

राहुल गांधी-संजय राऊतांच्या फोटोची चर्चा
ऑगस्टच्या सुरुवातीला खासदार संजय राऊत यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली होती. त्यावेळी राऊत आणि राहुल गांधी यांच्या एका फोटोची चांगलीच चर्चा झाली होती. राहुल गांधी राऊतांच्या खांद्यावर हात टाकत काहीतरी चर्चा करत असल्याचं या फोटोतून पाहायला मिळत होतं. त्याबाबत विचारलं असता, सध्या आम्ही महाराष्ट्रात हातात हात घालून काम करत आहोत. हातातला हात खांद्यावर आला इतकंच आहे. नक्कीच आमचे चांगलेच संबंध आहेत.

एकत्र राज्य करताना आणि सरकार चालवताना फक्त पक्ष जवळ येऊन चालत नाही मनही जवळ यावी लागतात. त्या दृष्टीनं जर काही पावलं पडत असतील तर लोक नक्कीच त्याचं स्वागत करतील. शिवसेनाच्या नेहमीच महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात मानाचं स्थान दिलं जातात. राहुल गांधी आणि माझी गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरु आहे. उद्धव ठाकरे यांचे निरोप त्यांना दिलेलं आहेत. राहुल गांधी महाराष्ट्रातील सरकारच्या कामगिरीवर समाधानी आहेत. राज्यातील सरकार आपण चालवायचं आहे त्यावर ते ठाम आहेत, असं संजय राऊत म्हणाले होते.