औरंगाबाद : समृद्धी महामार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू असून औरंगाबाद जिल्ह्यातील या महामार्गाचे काम ऑक्टोबरअखेरपर्यंत शंभर टक्के पूर्ण होईल. तथापि, या महामार्गावर फक्त चारचाकी व अवजड वाहनांसाठीच प्रवेश असेल. दुचाकी, तीनचाकी, ट्रॅक्टर या वाहनांसाठी प्रवेश नसणार आहे. विशेष म्हणजे या शीघ्रगती महामार्गावर नागपूर ते मुंबईपर्यंत कुठेही ‘टोल प्लाझा’ राहणार नाही.

वाहनधारकांना न थांबता अखंडपणे प्रवास करता येणार आहे. मात्र, महामार्गावरून बाहेर पडताना ‘स्लीप रोड’वर टोल बुथ असतील व तेथे ‘फास्टॅग’च्या माध्यमातून ‘टोल’ आकारला जाईल. ‘नागपूर ते मुंबई’मार्गे औरंगाबाद या समृद्धी महामार्गावर एकूण २४ ठिकाणी इंटरचेंजेस आहेत.

अधिक वाचा  राज्याच्या हवाई निर्बंधांवर केंद्राचा आक्षेप ; नियम सुसंगतीची सूचना

औरंगाबाद जिल्ह्यात शेंद्रा औद्योगिक वसाहत, सावंगी, माळीवाडा, हडस पिंपळगाव व जांबरगाव या पाच ठिकाणी इंटरचेंजेस आहेत. या ठिकाणांवरूनच वाहनधारकांना महामार्गावर प्रवेश करता येईल व बाहेर पडता येणार आहे. अधुन-मधून कुठेही या महामार्गावर प्रवेशही करता येणार नाही किंवा बाहेरही पडता येणार नाही.

‘एक्झिट बेस टोल’ची अशी आहे संकल्पना

यासंदर्भात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता बी. पी. साळुंके यांनी सांगितले की, समृद्धी महामार्गावर ‘एक्झिट बेस टोल’ची संकल्पना राबविण्यात येणार आहे. ज्यामुळे वाहनधारकांना विनाअडथळा अखंडपणे प्रवास करता येईल.

सध्या आपल्या राज्यामध्ये ‘एन्ट्रीबेस टोल’ अर्थात महामार्गावरून प्रवास करतानाच टोल द्यावा लागतो. त्यासाठी अनेकदा टोल प्लाझावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या असतात.

अधिक वाचा  एसटी कर्मचारी संपावरून देवेंद्र फडणवीसांनी केली टीका, “मेस्मा लावण्याऐवजी राज्य सरकारने.”

या महामार्गाची संकल्पना मुळातच ‘सुपर एक्स्प्रेस-वे’ (शीघ्रगती महामार्ग) असल्यामुळे या महामार्गावरून प्रवास करताना टोल देण्यासाठी कुठेही थांबावे लागणार नाही.
या महामार्गावर जेथून प्रवेश केला, तिथे संबंधित वाहनाची नोंद होईल व जिथे ते बाहेर पडेल तिथे ‘स्लीप रोड’वर असलेल्या टोल बुथवर एकूण किलोमीटरनुसार आपोआप टोल आकारला जाईल.