दुबई – आयसीसीने यंदा होत असलेल्या टी-20 विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. येत्या 17 ऑक्‍टोबरपासून सुरू होत असलेल्या या स्पर्धेत भारताचा सलामीचा सामना 24 ऑक्‍टोबरला परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे. या स्पर्धेचे मूळ यजमानपद भारताकडेच होते. मात्र, देशातील करोनाचा धोका कमी झाला नसल्याने स्पर्धा अमिरातीत हलवण्यात आली आहे.

या स्पर्धेचे सामने ओमान आणि अमिरातीत होत असून अंतिम सामना 14 नोव्हेंबरला खेळवला जाणार आहे. साखळी फेरीत 8 संघ सुपर 12 मध्ये स्थान मिळवण्यासाठी खेळतील. आयर्लंड, नेदरलॅंड्‌स, श्रीलंका आणि नामिबियाला अ गटात, तर ओमान, पीएनजी, स्कॉटलंड आणि बांगलादेशला ब गटात स्थान देण्यात आले आहे. प्रत्येक गटातील फक्‍त अव्वल दोन संघ दुसऱ्या फेरीत पात्र ठरतील.

अधिक वाचा  क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा स्मृतिदिन साजरा

ओमान आणि अमिरातीत खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेच्या पहिल्या फेरीत आठ पात्र संघ सहभागी होणार आहेत. यातील चार संघ सुपर 12 फेरी गाठतील. 2016 सालानंतर ही स्पर्धा यंदा होत आहे. त्यावेळी वेस्ट इंडिजने इंग्लंडला पराभूत करून त्या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते.

सुपर 12 चा पहिला सामना ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दुबईमध्ये 23 ऑक्‍टोबर रोजी खेळला जाईल. दुसरा सामना इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात त्याच दिवशी खेळला जाईल. तर सुपर 12 मध्ये, गट 2 मधील पहिला सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात दुबईच्या मैदानावर खेळला जाईल. या दिवशी फक्त एक सामना खेळला जाईल.

अधिक वाचा  'स्वच्छ'ला काम मिळताच साहित्य खरेदीही सुरू

सुपर 12 च्या गट 1 मध्ये वेस्ट इंडीज, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका यांच्या व्यतिरिक्त गट अ चा विजेता आणि गट ब चा उपविजेता संघ पहिल्या फेरीत असेल. दुसरीकडे, गट 2 मध्ये, भारत आणि पाकिस्तान, न्यूझीलंड, अफगाणिस्तानसोबत पहिल्या फेरीच्या गट ब चा विजेता संघ आणि गट अ चा उपविजेता संघ असेल.

राखीव दिवसाने दिलासा…

या स्पर्धेतील उपांत्य तसेच अंतिम लढतीसाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. आयसीसीच्या या निर्णयामुळे सगळ्याच संघांना दिलासा मिळाला आहे. पहिली उपांत्य लढत 10 नोव्हेंबर रोजी अबुधाबीत संध्याकाळी सहा वाजता सुरू होईल. तर, दुसरी लढत 11 नोव्हेंबर रोजी दुबईत होणार आहे. अंतिम लढत 14 नोव्हेंबर रोजी दुबईत संध्याकाळी सहा वाजता सुरू होणार असून या तीनही सामन्यांसाठी आयसीसीने राखीव दिवस ठेवला आहे. आयसीसीच्या अनेक स्पर्धांमध्ये पावसाने व्यत्त्यय आल्याच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे राखीव दिवस देण्यात येणार आहे.