पुणे- भाजपच्या विकासकामांची पोलखोल करणाऱ्यासाठी शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसने सोशल मीडियावर स्पर्धा आयोजित केली आहे. याला प्रत्युत्तर म्हणून पुणे शहर भाजपही मैदानात उतरली आहे. ‘राज्यातील महाविकास आघाडी सरकारने पुणे शहरासाठी केलेले एक भरीव विकासकाम दाखवा आणि रोख बक्षीस मिळवा’ अशी स्पर्धा भाजपने आयोजित केली आहे. विजेत्या स्पर्धकाला भाजपकडून 30 हजार रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केली आहे.

मुळीक म्हणाले, ‘राज्यात भाजपचे सरकार सत्तेत असताना मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली. मेट्रो, पीएमआरडीए स्थापना, पुणे विकास आराखड्याला मान्यता, भामा आसखेड प्रकल्प, समान पाणीपुरवठा प्रकल्प, स्वारगेट मल्टिमॉडेल ट्रान्सपोर्ट हब, चांदणी चौक बहुउद्देशीय वाहतूक प्रकल्प, बस खरेदी, कॅन्टोन्मेंट बोर्डासाठी विकासनिधी अशा विविध प्रकल्पांमुळे शहराच्या नियोजनबद्ध विकासाला चालना मिळाली.

अधिक वाचा  ठाकरे सरकारच्या सत्तेतील 2 वर्षांत भाजपा ने काय केले अन काय मिळवलं?

भाजप सत्तेत आल्यावर पुढील 50 वर्षांचा वेध घेत शहरात पायाभूत सुविधा निर्माण करण्यास सुरुवात झाली. मात्र, राज्यात महविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर पुन्हा शहराच्या विकासाला खीळ बसली आहे. गेल्या दीड वर्षांत शहरासाठी एकही नवीन प्रकल्प आणता आला नाही. साथीच्या आजारांची जबाबदारी राज्य सरकारवर असताना पुण्याला वाऱ्यावर सोडले. यांना साधे जम्बो कोविड सेंटरचे व्यवस्थापन करता आले नाही. शहराला निधी उपलब्ध करून दिला नाही.’