लंडन : एक वेळ अडचणीत आलेल्या भारतीय संघाला गोलंदाजांनी आधी फलंदाजीत योगदान देऊन सावरले. यानंतर त्यांनी टिच्चून मारा करत इंग्लंडला दुसर्‍या डावात १२० धावांत गुंडाळले आणि भारताला १५१ धावांनी दणदणीत विजय मिळवून दिला. यासह पाच सामन्यांच्या मालिकेत भारताने १-० अशी आघाडी घेतली आहे.

लॉर्ड्स मैदानावर भारताचा हा तिसरा कसोटी विजय ठरला. पहिल्या सामन्यातही भारताला विजयाची संधी होती, मात्र अखेरच्या दिवशी ही संधी पावसाने हिरावून नेली होती. दुसर्‍या सामन्यात मात्र भारताने सांघिक खेळाच्या जोरावर बाजी मारली. इंग्लंडला २७२ धावांचे लक्ष्य दिल्यानंतर भारतीयांनी सुरुवातीपासून टिच्चून मारा करत सामन्यावर पूर्ण नियंत्रण राखले. जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांनी भारताचा विजय साकारला. बुमराह व शमी यांनी इंग्लंडच्या सलामीवीरांना भोपळाही फोडू दिला नाही. भारताच्या विजयात मुख्य अडसर होता तो इंग्लंडचा कर्णधार जो रुट याचा. मात्र, बुमराहने भारताचा हा अडसर दूर करताना चहापानानंतर लगेच रुटला तंबूची वाट दाखवली. प्रमुख फलंदाज बाद झाल्यानंतरही भारताला झुंजवले ते जोस बटलरने. त्याचा एक सोपा झेल कर्णधार कोहलीने स्लीपमध्ये सोडला.

अधिक वाचा  आज उद्या रूजू व्हा नाहीतर बडतर्फी", प्रशासनाचा कर्मचाऱ्यांना इशारा

परंतु, याचा फटका बसणार नाही याची काळजी घेत सिराजने त्याला यष्टिरक्षक पंतकरवी झेलबाद केले. सिराजने मोक्याच्यावेळी ४ बळी घेत भारताच्या विजयात योगदान दिले. तसेच, बुमराह, इशांत शर्मा आणि शमी यांनी आघाडीच्या फलंदाजांवर वर्चस्व राखले. इंग्लंडच्या वतीने कर्णधार रुटने सर्वाधिक ३३ धावा केल्या. भारताने विजय मिळवला असला, तरी डावात दिलेल्या अतिरिक्त २९ धावा चिंता करणाºया आहेत.

शमी-बुमराह यांची झुंज!

मोहम्मद शमी व जसप्रीत बुमराह यांनी अप्रतिम फलंदाजी केल्याने भारतीय संघ पराभवाच्या छायेतून केवळ बाहेरच नाही आला, तर इंग्लंडवर वर्चस्वही मिळवले. शमी-बुमराह यांनी नवव्या गड्यासाठी केलली ८९ धावांची नाबाद भागीदारी भारताच्या विजयात निर्णायक ठरली. शमीने शानदार नाबाद अर्धशतक झळकावत ७० चेंडूंत ६ चौकार व एका षटकारासह ५६ धावा केल्या. त्याला जबरदस्त साथ दिलेल्या बुमराहने ६४ चेंडूंत ३ चौकारांसह नाबाद ३४ धावा केल्या.

अधिक वाचा  मुलांमध्ये शाळा सुरू झाल्यानंतर कोरोना वाढतोय का?

धावफलक
भारत (पहिला डाव) : १२६.१ षटकांत सर्वबाद ३६४ धावा.
भारत (दुसरा डाव) : लोकेश राहुल झे. बटलर गो. वूड ५, रोहित शर्मा झे. मोईन गो. वूड २१, चेतेश्वर पुजारा ४५, विराट कोहली झे. बटलर गो. कुरन २०, अजिंक्य रहाणे ६१, ॠषभ पंत झे. बटलर गो. रॉबिन्सन २२, रवींद्र जडेजा त्रि. गो. मोईन ३, इशांत शर्मा पायचीत गो. रॉबिन्सन १६, मोहम्मद शमी नाबाद ५६, जसप्रीत बुमराह नाबाद ३४. अवांतर – १५. एकूण : १०९.३ षटकांत ८ बाद २९८ धावा.

बाद क्रम : १८-१, २७-२, ५५-३, १५५-४, १६७-५, १७५-६, १९४-७, २०९-८.
गोलंदाजी : अँडरसन २५.३-६-५३-०; रॉबिन्सन १७-६-४५-२; वूड १८-४-५१-३; कुरन १८-३-४२-१; अली २६-१-८४-२, रुट ५-०-९-०.

अधिक वाचा  Omicron व्हेरियंट पुन्हा निर्बंध? राज्य मंत्रिमंडळाची तातडीची बैठक

इंग्लंड (पहिला डाव) : १२८ षटकांत सर्वबाद ३९१ धावा.
इंग्लंड (दुसरा डाव) : इंग्लंड (दुसरा डाव) : रोरी बर्न्स झे. सिराज गो. बुमराह ०, डॉमनिक सिब्ले झे. पंत गो. शमी ०, हासीब हमीद पायचीत गो. इशांत ९, जो रुट झे. कोहली गो. बुमराह ३३, जॉनी बेयरस्टो पायचीत गो. इशांत २, जोस बटलर झे. पंत गो. सिराज २५, मोइन अली झे. कोहली गो. सिराज १३, सॅम कुरन झे. पंत गो. सिराज ०, ओली रॉबिन्सन पायचीत गो. बुमराह ९, मार्क वूड नाबाद ०, जेम्स अँडरसन त्रि. गो. सिराज ०. अवांतर – २९. एकूण : ५१.५ षटकांत सर्वबाद १२० धावा.

बाद क्रम : १-१, १-२, ४४-३, ६७-४, ६७-५, ९०-६, ९०-७, १२०-८, १२०-९, १२०-१०.
गोलंदाजी : बुमराह १५-३-३३-३; शमी १०-५-१३-१, जडेजा ६-३-५-०, सिराज १०.५-३-३२-४, इशांत १०-३-१३-२.