पुणे -राज्यात पुढील दोन ते तीन दिवसात बहुतांश ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. विशेषत: मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा जोर वाढणार असून, पुण्यातही आगामी तीन दिवसांमध्ये जोरदार पावसाची शक्‍यता आहे.

राज्यात ऑगस्टच्या पहिल्या पंधरवाड्यात पावसाने हुलकावणी दिल्याने, शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. मात्र, आता नव्या अंदाजामुळे दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत. सध्या बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे. याच्या प्रमावामुळे राज्यात पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे.

बहुतांश भागांत दाट ढग साचल्याचे उपग्रह छायाचित्रांत दिसत आहे. परिणामी, पाऊस कमबॅक करण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. दरम्यान, शहर परिसरात सोमवारी ढगाळ वातावरण आणि पावसाच्या हलक्‍या सरी पडल्या.

अधिक वाचा  सोन्याचे भाव महिना अखेरीस कडाडले; चांदीच्या दरात मात्र घसरणच

पुण्यासाठी यलो, ऑरेंज अलर्ट

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुणे शहर परिसरात येत्या 48 तासांत जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्‍यता आहे. शहर परिसरासाठी 17 ऑगस्ट रोजी पावसाचा ‘यलो’, तर 18 ऑगस्ट रोजी ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. त्यामुळे आगामी 48 तासात पावसाचा जोर वाढणार असल्याचे स्पष्ट होते.