कोल्हापूर – ‘मराठा आरक्षण आणि ओबीसींचे राजकीय आरक्षण याविषयावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार हे समाजाची शुद्ध फसवणूक करत आहेत. ‘खोटं बोल पण रेटून बोल’ही त्यांची निती आहे. मराठा आरक्षणप्रश्नी पवार ज्या ज्या ठिकाणी सभा घेतील त्याच ठिकाणी दुसऱ्या दिवशी भारतीय जनता पक्षातर्फे सभा घेतली जाईल आणि पवार हे आरक्षणप्रश्नी समाजाची कशी दिशाभूल करत आहेत, त्याचा पोलखोल करू’असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला.

कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलताना भाजपा प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी शरद पवार यांच्यासह काँग्रेस पक्षावरही जोरदार टीकास्त्र सोडले. ‘राज्य मागासवर्ग आयोगाला इंम्पिरिकल डाटा’करण्यासाठी जो खर्च येणार आहे, त्यासाठी राज्य सरकार पैसे उपलब्ध करुन देत नाही’अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारचे वाभाडे काढले.

१०२ वी घटनादुरुस्ती, मराठा आरक्षण, ओबीसींचे राजकीय आरक्षण याविषयावरुन राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी मोदी सरकारचा समाचार घेतला. तसेच आरक्षण विषयासंबंधी केंद्र सरकार कशी फसगत करत आहे हे समाजाच्या निदर्शनाला आणून देण्यासाठी राज्यभर दौरे काढणार असल्याचेही पवार यांनी जाहीर केले आहे.

अधिक वाचा  पुणे : दोन दिवस पाणीपुरवठा बंद असणार

५८ वर्षे सत्तेत मग कुणी हात बांधले होते ?

पवार यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘स्वातंत्र्यांच्या ७५ वर्षापैकी केंद्रात आणि राज्यात तब्बल ५८ वर्षे यांचेच सरकार होते. मग त्यावेळी मराठा आरक्षण द्यायला द्यायला यांचे हात कुणी बांधले होते. जे काम स्वत:ला करायला जमत नाही त्याचे खापर दुसऱ्यावर फोडण्यात ते हुशार आहेत.

मराठा आरक्षण विषय त्यांना शेकणार हे लक्षात आल्यामुळे ते केंद्र सरकावर टीका करत आहेत. मराठा समाज हा दुधखुळा नाही. त्यांना पवारांची खेळी लक्षात आली आहे. मराठा आरक्षण व ओबीसी राजकीय आरक्षणासंबंधी राज्यातील तत्कालिन भाजप सरकारने काय केले आणि सध्याचे महाविकास आघाडी सरकार काय करत आहे यासंबंधी ‘दूध का दूध आणि पाणी का पाणी’होण्यासाठी मंत्रालयात पाच प्रमुख पक्षाच्या प्रमुख नेत्यांची राऊंड टेबल घ्या. भाजपतर्फे त्यामध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सहभागी होतील.

अधिक वाचा  किरण गायकवाड ‘देवमाणूस २’मध्ये दिसणार कि नाही?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये ही राऊंड टेबल प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधीसमोर होऊ दे. राष्ट्रवादीकडून पक्षप्रमुख म्हणून शरद पवार सहभागी होतील. काँग्रेसचे प्रमुख नेते असतील. त्या बैठकीत खरे खोटे स्पष्ट होईल.’ पत्रकार परिषदेला भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे उपस्थित होते.

सहा आयोगाचा अहवाल स्वीकारलाच कशासाठी ?

‘आरक्षण प्रश्नावरून पवार यांनी जे भाष्य केले आहे ते मती गुंग करणारे आहे. राजकारणात खऱ्याचा सामना करता येत नसेल तर समाजात गोंधळाला टाकण्याची खेळी केली जाते, पवार सध्या तेच करत आहेत’ अशी बोचरी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली. पाटील म्हणाले,’राज्यातील सध्याच्या राज्यकर्त्यांना मराठा समाजाला आरक्षण द्यायची ईच्छा नाही.

सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर तत्काळ फेरविचार याचिका दाखल करणे आवश्यक होते. मात्र महाविकास आघाडी सरकारने फेरविचार याचिका दाखल करायला विलंब लावला. शिवाय मागासवर्ग आयोगाची स्थापना करायला उशीर केला.

अधिक वाचा  कुसुमाग्रज निवासस्थानापासून वाजत गाजत ग्रंथदिंडी; साहित्य संमेलन होणार अध्यक्षाविना!

काँग्रेस, राष्ट्रवादी सरकारच्या कालावधीत यापूर्वी सहा वेळा नेमलेल्या आयोगाने प्रत्येकवेळी मराठा समाज हा आर्थिकदृष्टया मागास नाही असा अहवाल दिला होता. बहुतांश मराठा समाज आर्थिकद्ष्टया मागास असताना, त्यांना आरक्षणाची गरज असताना काँग्रेस, राष्ट्रवादीच्या राज्यकर्त्यांनी ज्या त्या वेळी ते अहवाल फेटाळले का नाहीत ?

अहवाल फेटाळायचा की स्वीकारायचा हा अधिकार राज्य सरकारला असतो. आता सुप्रीम कोर्टाने गायकवाड आयोगाचा अहवाल फेटाळल्यामुळे मराठा समाज हा मागास आहे हे पहिल्यांदा राज्य सरकारला ठरवावे लागेल. मात्र राज्य सरकारची तशी ईच्छा नाही. आरक्षणप्रश्नी पवार हे दिशाभूल करत आहेत. यामुळे ते ज्या ज्या ठिकाणी दौरे करतील त्या ठिकाणी भाजपा दुसऱ्या ठिकाणी सभा घेऊन पवार यांच्या भूमिकेची पोलखोल करू.’