मुंबई : बहिणींचा किक बॉक्सिंग खेळ पाहून खेळाकडे वळालेल्या लवलिना बोरगोहेन हिने टोकियो ऑलिम्पिकमध्ये शानदार कामगिरी करताना भारताला बॉक्सिंगमध्ये कांस्य पदक मिळवून दिले. अशी कामगिरी करणारी लवलिका ही विजेंदर सिंग आणि मेरी कोम यांच्यानंतरची केवळ तिसरी भारतीय ठरली. या यशाचे श्रेय लवलिनाने आपल्या आईला दिले असून ती नेहमी, काहीतरी करुन दाखवायचे आहे, असे सांगत आम्हाला प्रेरीत करायची, असे लवलिनाने म्हटले.

ऑलिम्पिक यशाच्यानिमित्ताने लवलिनाशी साधलेला विशेष संवाद…

पहिल्यांदाच ऑलिम्पिक खेळताना पदक जिंकली, काय सांगशील?

हे एक स्वप्न पूर्ण झाल्यासारखे आहे. मी माझ्या पहिल्या ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण जिंकण्याचे लक्ष्य बाळगले होते. अखेरच्या लढतीपर्यंत मी स्वत:ला अजून आपण पदक जिंकले नसल्याचे सांगत होती. मी कांस्य जिंकले असले, तरी मला माझे सुवर्ण पदकाचे स्वप्न पूर्ण करायचे असून पॅरिस आॅलिम्पिकमध्ये मी हे स्वप्न नक्की पूर्ण करेन. सर्वात मोठ्या क्रीडा स्पर्धेत देशाचे नाव उंचावण्यात यश मिळाले, याचा आनंद आहे. एकूणच हा अविस्मरणीय अनुभव ठरला.

अधिक वाचा  'स्वच्छ'ला काम मिळताच साहित्य खरेदीही सुरू

कांस्य पदकाच्या लढतीदरम्यान काय विचार सुरु होते?

यावेळी मी भावनिक झाले होते. पराभव हा पर्याय होऊ शकत नाही, असे मी स्वत:ला सांगितले. मी प्रतिस्पर्धी बॉक्सरविरुद्ध चारवेळा पराभूत झाले होते, पण मी कोणत्याही भीतीविना खेळले आणि यावेळी माझ्याकडे गमावण्यासारखे काहीही नव्हते, पण सर्वकाही मिळवायचे होते. मी स्वत:वर विश्वास ठेवला आणि कांस्य मिळवले.

मेरीकोमच्या कामगिरीशी बरोबरी केल्यानंतर कसे वाटते?

हा अनुभव शब्दांत व्यक्त करता येणार नाही. आम्ही सर्वजण मेरीकोमला पाहून लहाणाचे मोठे झालो. माझ्यासह अनेक बॉक्सर्सना मेरीने प्ररीत केले आहे आणि आताही करत आहे. २०१२ साली मी मेरीकोमला ऑलिम्पिक पदक जिंकताना पाहिले आणि आता अशी कामगिरी करणारी मी तिच्यानंतरची दुसरी भारतीय महिला बॉक्सर ठरली. हा खूप मोठा सन्मान आहे. पण आता मला अजून खूप यश मिळवायचे आहे आणि ही केवळ सुरुवात आहे.

अधिक वाचा  omicron Virus ची 23 देशांत धडक, WHO चा गंभीर इशारा

खेळासाठी घरून कशा प्रकारे पाठिंबा मिळाला?

अनेक अडचणी असतानाही माझ्या पालकांनी कधीही मला आणि माझ्या दोन्ही बहिणींना खेळापासून दूर जाऊ दिले नाही. त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवताना, कायम पाठिंबा दिला. त्यांच्यामुळेच आज मी इथपर्यंत पोहचू शकले. माझी आई आम्हा तिघी बहिणींना कायम सांगायची की, काहीतरी करुन दाखवावे लागेल. आईचे हे शब्द कायम प्रेरणादायी ठरले आणि आज ऑलिम्पिक पदक मिळवल्याचा आनंद आहे. मला आतापर्यंत पाठिंबा दिलेल्या सर्वांचे मनापासून आभार.

मुलींना काय संदेश देशील?

मुलींना सांगेन की, स्वत:वर आणि आपल्या स्वप्नांवर विश्वास ठेवा. सर्वकाही तुम्ही मिळवू शकता. तुम्हाला तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कोणतीही गोष्ट रोखू शकत नाही. फक्त मेहनतीची तयारी ठेवा.