मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 14 ऑगस्ट हा दिवस फाळणी वेदना दिवस म्हणून साजरा करण्याचं जाहीर केलं आहे. मोदींच्या या घोषणेवर शिवसेनेने प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. इंदिरा गांधींनी पाकिस्तानची फाळणी करून या वेदना कमी केल्या. भाजपचे अखंड हिंदुस्थानचे स्वप्न होते. त्यांनी हे स्वप्न पूर्ण करून फाळणीच्या वेदना कमी कराव्यात, असा चिमटा शिवसेना नेते संजय राऊत यांनी काढला आहे.

संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना जेव्हा जेव्हा भेटलो तेव्हा तेव्हा त्यांच्या लाहोर आणि कराचीच्या आठवणी निघाल्या. त्यावर चर्चा झाली. भारत-पाक फाळणीच्या वेदना अनुभवलेले आज देशात मोजकेच लोक आहेत. जे पंजाब, लाहोर, पाकिस्तान, सिंध प्रांतातून आले, ते सर्वस्व गमावून येथे आले होते. त्यावर अनेक चित्रपट आणि पुस्तकं निघाली. पंतप्रधान म्हणतात 14 ऑगस्ट वेदनेचा दिवस आहे व ही वेदना सदैव आम्हाला आहे. फाळणीची वेदना इंदिरा गांधी यांनी थोडी फार कमी केली. पाकिस्तानची फाळणी करून त्यांनी ही वेदना कमी केली. इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानची फाळणी करून दाखवून दिलं. भाजपचं स्वप्न हे अखंड हिंदुस्थानचे स्वप्न आहे. ते त्यांनी पूर्ण करावं आणि ही वेदना त्यांनी कायमची दूर करावी, असा चिमटा राऊत यांनी काढला.

अधिक वाचा  दिल्लीचं ठरलं! तुरुंगातूनच सरकार चालवणार, अरविंद केजरीवालांचा पहिला आदेश जारी

काश्मिरी पंडितांची घरवापसी कधी?

आमचे कश्मिरी पंडित आजही हजारोच्या संख्येने निर्वासित आहेत. फाळणीच्या नंतर जे लोक इथे आले ते निर्वासित म्हणून जगले. आजही निर्वासितांच्या अनेक वस्त्या आहेत. आजही अनेक काश्मिरी पंडित हे निर्वासित म्हणून जगत आहेत. त्यांची घरवापसी कधी होईल? या सरकारमधील अनेक लोकांनी अनेक गर्जना केल्या आहेत. आम्ही अखंड काश्मीर निर्माण करू तो दिवस उगवेल. पाकव्याप्त काश्मीर हिंदुस्थानात आणला जाईल तेव्हा ती आमची फाळणीची वेदना कमी होईल. आम्हाला फाळणीचे वेदना आहे आणि त्यामुळे आम्ही अस्वस्थ असतो. मोदींनाही ती अस्वस्थता जाणवली. त्यांनी लाल किल्ल्यावरून ते स्पष्ट केलं. ही वेदना घेऊन चालणार नाही.

अधिक वाचा  लॉकर किंवा भिंतीत नव्हे, चक्क वॉशिंग मशीनमध्ये दडवले होते 2.54 कोटी रुपये; ईडीच्या छाप्यात झाले उघड

त्या वेदनेवर ते उपचार करण्यासाठी तुम्हाला अखंड हिंदुस्थानचे स्वप्न आहे ते पूर्ण करावे लागेल. पाकव्याप्त काश्मीर किंवा कश्मिरी पंडितांच्या घरवापसीचा प्रश्न मार्गी लावावा लागेल तरच ही वेदना कमी होईल. इंदिरा गांधींनी पाकिस्तानला तोडून बांगलादेश बनवला. खूप मोठ्या मर्दानगीच काम इंदिरा गांधी यांनी केल होतं. अशा पद्धतीचे काम जर हे सरकार करणार असेल तर आम्ही त्यांच्या सोबत आहोत, असं ते म्हणाले.

भारताने सावध रहावं

यावेळी त्यांनी अफगाणिस्तानातील कलहावरही भाष्य केलं. अफगाणिस्तानमध्ये सध्या जे सुरू आहे. त्याबाबत संपूर्ण जगाला चिंता लागून राहिली आहे. अफगाणिस्तानातील घडामोडींचा जगावर काय परिणाम होईल याचा अमेरिकेपासून रशिया आणि भारतालाही चिंता लागली आहे. तालिबानी लोक लोकशाही मानत नाहीत. त्यांनी ज्या पद्धतीने अफगाणिस्तानवर ताबा मिळवला. त्यामुळे सावध राहिलं पाहिजे. आपल्या देशातील लोकही तिथे अडकून पडले आहेत, असं सांगतानाच हिंदुस्थानातील व्यवहार, कायदा सुव्यवस्था या सर्वच बाबतीत भारताने सतर्क राहिलं पाहिजे, असं त्यांनी सांगितलं.

अधिक वाचा  महायुतीत जागावाटप गुंता असताना भाजपच्या मात्र सुस्साट 23 जागांचे वाटप शिंदे-अजितदादांच्या पदरी निराशाच?

तोवर चीनसमोर झुकावे लागणार

यावेळी त्यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांच्या मतांशी सहमती दर्शवली. जोवर आपण चीनवर अवलंबून आहोत, तोवर आपल्याला त्यांच्यासमोर झुकावे लागणार आहे. अफगाणिस्तानातील तालिबानी राजवटीला सर्वात आधी चीनने पाठिंबा दिला याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. चीन आजवर आपल्यासाठी डोकेदुखी बनून राहिला आहे.

आजही आपले आर्थिक व्यवहार चीनवर अवलंबून आहेत. चीनची आर्थिक परिस्थिती आपल्यावर अवलंबून आहे. मोहन भागवत यांनी जे म्हटलं त्यावर सरकारने विचार करायला हवा. गलवानमध्ये आपले अनेक सैनिक मारले गेले तेव्हा पार्लमेंटमध्ये आम्ही हा मुद्दा उचलला होता. चीनसोबतचा ट्रेड आणि आर्थिक व्यवहार व्यापार संपवायला हवा. जेव्हा पंतप्रधान आत्मनिर्भर व्हा म्हणतात तेव्हा चीनशी व्यापार तोडून आत्मनिर्भर होण्यास मार्ग हा तिथून सुरू होतो, असंही त्यांनी सांगितलं.