काबुल- अफगाणिस्तानवरील आपली पकड तालिबानने मजबूत केली आहे. या पार्श्वभूमीवर तालिबानचे प्रवक्ते मुहम्मद सोहेल शाहीन यांची एएनआय या वृत्तसंस्थेने मुलाखत घेतली आहे. यावेळी मुहम्मद सोहेल शाहीन यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. जर भारत देशात आला आणि अफगाण सैन्याला मदत करण्याचा प्रयत्न केला तर ती त्यांच्यासाठी चांगली गोष्ट नाही. इतर देशांनी अफगाणिस्तानमध्ये सैन्य आणल्यानंतर त्यांची काय अवस्था झाली हे त्यांनी पाहिलं असेल. हे सगळं सर्वांसमोर आहे, असं ते म्हणाले आहेत. एकप्रकारे शाहीन यांनी भारताला इशारा दिला आहे.

अफगाणिस्तानमध्ये गुरुद्वारावरुन धार्मिक झेंडा उतरवण्यात आला होता. यावर बोलताना शाहीन म्हणाले की, ‘शीख समुदायाने स्वत: तो झेंडा काढला होता. आमचे सैन्य ज्यावेळी तेथे गेले, त्यावेळी ते म्हणाले की झेंडा पाहून त्यांच्यावर अत्याचार केले जाऊ शकतात. तालिबान सैन्यांने त्यांना जेव्हा विश्वास दिला, तेव्हा निशान साहीब पुन्हा फडकवण्यात आला.’

अधिक वाचा  सचिन वाझे-परमबीर सिंह भेट; देशमुख यांच्या वकीलांची नाराजी

भारतीय प्रतिनिधी आमच्या प्रतिनिधींची भेट घेत असल्याची चर्चा आहे. पण, अशी कोणतीही भेट झाली नाही, पण काल डोहाच्या बैठकीमध्ये भारतीय प्रतिनिधी सहभागी झाले होते, असं शाहीन म्हणाले. अफगाण भूमि भारतविरोधी कारवायासाठी वापरी जाणार नाही याची काय खात्री आहे, असा सवाल शाहीन यांना करण्यात आला. यावर ते म्हणाले की, ‘आमची भूमि इतर देशांविरोधात वापरु न देण्यासाठी आम्ही बांधिल आहोत.’

पाकिस्तानमधील दहशतवाद्यांशी तालिबानचा संबंध आहे का? असा प्रश्न शाहीन यांना विचारण्यात आला. यावर ते म्हणाले की,’ ‘हे आरोप निराधार आहेत. याला कोणताही पाया नाही. केवळ राजकीय हेतूने हे आरोप केले जात आहेत.’ आमच्याकडून कोणत्याही दूतावास किंवा प्रतिनिधींना धोका नाही. आम्ही दूतावास आणि प्रतिनिधींवर हल्ला करत नाही, असं शाहीन म्हणाले.

अधिक वाचा  धनुषला आंतरराष्ट्रीय स्तरावरही सन्मान; सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर

भारताने अफगाणिस्तानी लोकांसाठी केलेल्या कामाचे आम्ही कौतुक करतो. भारताने अफगाणिस्तानच्या विकासासाठी अनेक प्रोजेक्ट हाती घेतले आहेत. विकास कामांना पाठबळ देऊन भारत अफगाण लोकांची मदत करत आहे. त्यांचे हे काम नक्कीच चांगले आहे, असं शाहीन म्हणाले. अफगाणिस्तानमधील भारताच्या प्रोजेक्टच्या भविष्याबाबत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलंय.