मुंबई: फडणवीस सरकारच्या काळात भाजपने काबीज केलेल्या पुणे महानगरपालिकेची आगामी निवडणूक पक्षासाठी अवघड ठरण्याची चिन्हे दिसत आहेत. आगामी पालिका निवडणुकीत भाजपला बहुमताचा आकडा गाठता येणार नाही, असा निष्कर्ष एका सर्वेक्षणातून पुढे आला आहे. विशेष म्हणजे हे सर्वेक्षण भाजपकडूनच करण्यात आले होते. त्यामुळे भाजपच्या गोटात सध्या अस्वस्थता पसरली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपकडून काही दिवसांपूर्वीच हे सर्वेक्षण करण्यात आले होते. पक्षातील मोजक्याच वरिष्ठ नेत्यांना याविषयी माहिती होती. या सर्वेक्षणातील आकेडवारी आणि निष्कर्ष भाजपची चिंता वाढवणारे आहेत. आगामी पालिका निवडणुकीत भाजपला जास्तीत जास्त 75 ते 80 जागांवरच विजय मिळेल, असे या सर्वेक्षणात म्हटले आहे.

अधिक वाचा  राज्याच्या हवाई निर्बंधांवर केंद्राचा आक्षेप ; नियम सुसंगतीची सूचना

गेल्यावेळी राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर भाजपसाठी अनुकूल वातावरण असल्याने पुणे महानगरपालिकेत भाजपला घवघवीत यश मिळाले होते. भाजपच्या नगरसेवकांची संख्या चौपटीने वाढून 90 पेक्षा जास्त झाली होती. पुणे महानगरपालिकेत एकूण 164 जागा आहेत. बहुमतासाठी राजकीय पक्षाकडे 84 नगरसेवकांचे संख्याबळ असणे गरजेचे आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत बहुमताचा आकडा न गाठता आल्यास भाजप कोणाची मदत घेणार, हे पाहावे लागेल.

दुसरीकडे भाजपकडून आगामी काळात पुण्यातील पक्षबांधणीवर भर देण्यात येईल. तसेच नाराजांची समजूत काढली जाईल, अशी माहिती भाजपमधील वरिष्ठ नेत्यांनी दिली.

शिवसेनेची 80 जागांची मागणी

मुंबईनंतर पुणे महापालिका सर्वच राजकीय पक्षांसाठी प्रतिष्ठेचा विषय आहे. त्यामुळे महापालिकेची निवडणूक पुढील वर्षी होणार असली तरी आतापासूनच सर्व राजकीय पक्षांनी तयारी सुरु केल्याचं दिसून येत आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी तर जागांचं गणितच मांडलं आहे. पुणे महानगरपालिकेची निवडणूक महाविकासआघाडीने एकत्र लढवली तरी शिवसेना 80 जागांवर लढेल, अशी घोषणा संजय राऊत यांनी केली होती. सध्या शिवसेना लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी संघटनात्मक काम करत आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जनमानसातील प्रतिमा दिवसेंदिवस उंचावत आहे. त्यामुळे पुण्यातील आगामी निवडणुकीत शिवसेनेच्या नगरसेवकांची संख्या एकेरी राहणार नाही, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला होता.

अधिक वाचा  "पवारांना अडकवण्याचाच ममतांचा डाव, काँग्रेसविरोधातही कट सुरूच"

भाजप गिरीश बापटांच्या नेतृत्वात लढणार

दुसरीकडे सत्ताधारी भाजपनेही महापालिका निवडणुकीसाठी आता कंबर कसली आहे. महापालिका निवडणूक ही खासदार गिरीश बापट यांच्या नेतृत्वाखालीच लढवल्या जातील, असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलंय. त्याचबरोबर त्यांनी नगरसेवकांनाही कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. कोरोनामुळे दीड वर्ष वाया गेलं आहे. कोरोना आधी तीन वर्ष नगरसेवकांना काम करण्यासाठी चांगली संधी मिळाली होती. आता फक्त सहा महिनेच उरले आहेत. त्यामुळे खुर्ची टाकून बसा. हातात काठी घेऊन काम करा. तरच सत्तेत याल, असे आदेश चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत.

अधिक वाचा  संप करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना मोठा धक्का; धक्कादायक निर्णय

पुणे महापालिका पक्षीय बलाबल
भाजप 99
काँग्रेस 9
राष्ट्रवादी 44
मनसे 2
सेना 9
एमआयएम 1

एकूण 164