यंदा युएईमध्ये होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपनंतर भारतीय पुरुष क्रिकेट संघाला नवे प्रशिक्षक निवडावे लागण्याची शक्यता आहे. भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री, गोलंदाजी प्रशिक्षक भारत अरुण, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर. श्रीधर आणि फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड हे चौघेही त्यांचे पद सोडण्याच्या विचारात आहेत.

प्रशिक्षकपद सोडण्याबाबत शास्त्री यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या काही सदस्यांशी चर्चा केली आहे. टी-२० वर्ल्डकपनंतर शास्त्री यांचा करार संपुष्टात येणार असून ते पुन्हा नव्याने करार करण्यास फारसे उत्सुक नसल्याची माहिती देण्यात आली आहे. सपोर्ट स्टाफमधील काही सदस्यांनी आयपीएलमधील संघांशी बोलणीही सुरु केल्याचेही म्हटले जात आहे.

अधिक वाचा  राज्यात जिल्हा बँक : भाजपला मोठा झटका तर मविआ चे वर्चस्व

शास्त्री यांची सर्वात आधी २०१४ मध्ये भारतीय संघाचे संचालक म्हणून नियुक्ती झाली होती. २०१६ सालच्या टी-२० वर्ल्डकपपर्यंत त्यांनी हे पद भूषवले. त्यानंतर २०१७ सालच्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत अंतिम सामन्यात भारतीय संघ पराभूत झाल्यानंतर शास्त्री यांची मुख्य प्रशिक्षक म्हणून निवड करण्यात आली. शास्त्री यांच्या मार्गदर्शनात भारताने ऑस्ट्रेलियात सलग दोन वेळा कसोटी मालिका जिंकण्याची ऐतिहासिक कामगिरी केली. तसेच भारताने पहिल्यावहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेची अंतिम फेरीही गाठली होती. परंतु, त्यांच्या कार्यकाळात भारताला आयसीसीची एकही स्पर्धा जिंकता आली नाही.

आता नियमांनुसार, टी-२० वर्ल्डकपनंतर भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज मागवले जातील. या पदासाठी भारताचा माजी कर्णधार आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा अध्यक्ष राहुल द्रविडला प्रमुख दावेदार मानले जात आहे. द्रविडच्या मार्गदर्शनात बऱ्याच नवख्या खेळाडूंचा समावेश असलेल्या भारतीय संघाने श्रीलंकेत एकदिवसीय मालिका जिंकली. तसेच द्रविडने भारत ‘अ’ आणि भारताच्या १९ वर्षांखालील संघाचे प्रशिक्षकपदही याआधी भूषवले आहे. त्यामुळे त्याला सध्याच्या भारतीय संघातील खेळाडूंसोबत काम करण्याचा अनुभव असून ही बाब त्याच्या पथ्यावर पडू शकेल.