पुणे – राज्यातील करोना संसर्ग अटोक्यात आला असून राज्य सरकारकडून लागू असलेले निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. त्यानुसार, मुंबईत सामान्यांना लोकल प्रवासासाठी मुभा दिली आहे. त्याच पार्श्वभूमीवर पुणे-लोणावळा लोकल व दौंड डेमू प्रवासासाठी समान्यांना परवानगी दिली जाण्याची शक्यता आहे. मात्र, त्यासाठी प्रवाशांनी करोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेले असावेत, तसेच दुसरा डोस घेऊन 14 दिवसांचा कालावधी पूर्ण झालेला असावा, अशी अट घालण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. तसेच प्रवाशांना पोलीसांकडून फोटोपास देण्यात येणार आहे. लवकरच या निर्णयाची कार्यवाही सुरु होण्याची शक्यता आहे.

अधिक वाचा  एसटी कर्मचारी संपावरून देवेंद्र फडणवीसांनी केली टीका, “मेस्मा लावण्याऐवजी राज्य सरकारने.”

सध्या केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच लोकल प्रवासाची मुभा आहे. मात्र, आता मागणीनंतर सामान्यांनाही प्रवासास परवानगी देण्यात येणार आहे. सध्या दिवसातून लोकलच्या पुणे-लोणावळा चार फेऱ्या आणि पुणे-दौंड चार फेऱ्या होत आहेत. प्रवाशांची संख्या वाढत गेल्यास या फेऱ्यांमध्ये वाढ होऊ शकते.

पाससाठी करावा लागणार अर्ज –

लोकलने प्रवास करण्यासाठी फोटो पासची आवश्यकता आहे. हा पास असेल तरच लोकलचे तिकीट दिले जाणार आहे. हा पास मिळवण्यासाठी प्रवाशांना पोलीस प्रशासनाकडे आवश्यक त्या कागदपत्रांसह अर्ज करावा लागेल. त्यानंतर अर्जाची छाननी करून निकषात बसणाऱ्या प्रवाशांना पास दिला जाणार असल्याची माहिती आहे.