मुंबई : अश्लील चित्रपटांची निर्मिती करून ॲपद्वारे प्रसारित केल्याबद्दल अटकेत असलेला व्यावसायिक राज कुंद्रा याच्या जामीन अर्जावर मुंबई पोलिसांनी आक्षेप घेतला. राज कुंद्रा याची जामिनावर सुटका झाल्यास समाजात चुकीचा संदेश जाईल, असा युक्तिवाद पोलिसांनी न्यायालयात केला.

राज कुंद्रा गुन्ह्याची पुनरावृत्ती करेल किंवा फरार होण्याचा प्रयत्न करेल, अशी माहिती पोलिसांनी न्यायालयाला दिली. राज कुंद्रा हा सध्या न्यायालयीन कोठडीत आहे व त्याने जामिनासाठी सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. पोलिसांनी या प्रकरणी एप्रिलमध्ये दोषारोपपत्र दाखल केले. मात्र, त्यात आपले आरोपी म्हणून नाव नाही, असे कुंद्रा याने जामीन अर्जात म्हटले आहे.

अधिक वाचा  CNG चे दर २ महिन्यांत ३री वाढ; १४ रुपयांनी वर्षभरात वाढले दर !

ज्या आरोपींची नावे दोषारोपपत्रात आहेत त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. दंडाधिकाऱ्यांनी जामीन अर्ज फेटाळण्यात चूक केली आहे. संपूर्ण आदेश हा अनुमानांवर आधारित आहे. त्यामुळे तो रद्द करण्यात यावा. कथित गुन्ह्यात आरोपीचा सहभाग आहे, हे सिद्ध करणारे पुरावे नाहीत, याचा विचार दंडाधिकाऱ्यांनी केला नाही, असे कुंद्रा याने जामीन अर्जात म्हटले आहे.

पोलिसांनी या जामीन अर्जावर उत्तर देताना म्हटले आहे की, हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे आणि सर्व व्हिडिओ कुठे अपलोड करण्यात आले आहेत, हे आम्ही शोधत आहोत. जर आरोपीचा जामीन अर्ज मंजूर करण्यात आला तर तो गुन्ह्याची पुनरावृत्ती करेल. त्याचा परिणाम आपल्या संस्कृतीवर होईल. त्याचबरोबर समाजात चुकीचा संदेश जाईल. तसेच कुंद्रा हा फरारी आरोपी प्रदीप बक्षी याचा नातेवाईक आहे. कुंद्रा ब्रिटिश नागरिक असल्याने त्याची जामिनावर सुटका झाली तर तो फरारी होण्याची शक्यता आहे. तो परदेशात गेला तर तिथून आक्षेपार्ह व्हिडिओ अपलोड करण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे पोलिसांनी न्यायालयाला सांगितले. न्यायालयाने या जामीन अर्जावरील पुढील सुनावणी २० ऑगस्ट रोजी ठेवली आहे.

अधिक वाचा  पराग अग्रवाल ट्विटरचे नवे CEO ; एकमताने निवड जॅक डोर्सी पायउतार

मुंबई पोलिसांनी गेल्यावर्षी अशाच प्रकरणात दाखल केलेल्या गुन्ह्यांत अटकपूर्व जामिनासाठी राज कुंद्रा याने सत्र न्यायालयात अर्ज केला होता. मंगळवारी न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीन फेटाळला.