पुणे – भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट सहकारी पतसंस्था अर्थात बीएचआर या संस्थेतील कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यातील संशयित आरोपी सुनील देवकीनंदन झंवर (रा.जय नगर, जळगाव) याला मंगळवारी (दि. ९) आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने नाशिकमध्ये अटक केली.

डेक्कन जिमखाना पोलीस ठाण्यात २५ नोव्हेंबर रोजी सेवानिवृत्त शिक्षिका तथा ठेवीदार रंजना खंडेराव घोरपडे (६५) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन या पतपेढीविरुद्ध फसवणूक व अपहाराचा गुन्हा दाखल झाला आहे. आतापर्यंत तपासात सुमारे ६२ कोटी रुपयांचा अपहार झाल्याचे तपासात पुढे आले आहे. या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार जितेंद्र कंडारे याला दोन महिन्यापूर्वी इंदूर येथून अटक करण्यात आली आहे. तो सध्या कारागृहात आहे.

अधिक वाचा  बार्बाडोस प्रजासत्ताक; ब्रिटनच्या राणीचा ४०० वर्षांचा अंमल संपला

झंवर व कंडारे या दोघांना न्यायालयाने फरार घोषीत करण्याची प्रक्रीया सुरु केली होती. जिल्हा व उच्च न्यायालयाने दोघांचा अटकपूर्व जामीन वेळोवेळी फेटाळून लावला होता. झंवर हा वेशांतर करुन जळगाव, मुंबई, राजस्थान व इंदूर येथे वावरत होता.

पोलिसांचे पथक गेले नऊ महिने त्याच्या मागावर होते. तो नाशिकच्या पंचवटी परिसरात असल्याची माहिती मिळाल्यावर सोमवारी ( दि. ९) आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने तेथे सापळा रचला होता. पोलीस निरीक्षक सुचेता खोकले व त्यांच्या पथकाने मंगळवारी सकाळी त्याला अटक केली.