कोथरूड सुतारदरा परिसरातील ८० वर्षांच्या आजी घराचा रस्ता विसरून वारजे माळवाडी पोचल्या होत्या. वारजे माळवाडी पोलिसांनी कार्य तत्परता दाखवत त्या आजींना घरी नातेवाईकांच्या स्वाधीन केले. त्यांना नाव फक्त सांगता येत होते. पोलिसांनी त्यांचा फोटो व नाव सोशल मीडियावर व्हायरल केल्याने त्यांच्या नातवाईकांचा पत्ता लागला.

सहायक पोलिस उपनिरीक्षक एस. एस. पाठक यांनी सांगितले, की शनिवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास पोलिस हवालदार बाळू गायकवाड यांना मिळालेल्या माहिती दिल्यानुसार, वारजे माळवाडी बसस्टॉपजवळ एक ज्येष्ठ महिला सकाळपासून बसलेली असल्याचे निदर्शनास आले. त्या थंडीने कुडकुडत होत्या. त्यांनी तिला चहापाणी दिले. त्यांना नाव, पत्ता विचारल्यावर त्यांनी नाव सोनाबाई काजळे असे सांगितले. त्या कुठ राहतात, ते मात्र सांगता आले नाही. तिचे नातवाईक मिळावे, म्हणून पोलिसांनी तिचा फोटो सोशल मीडियावर टाकला.

अधिक वाचा  सरकारने पंतप्रधान आवास योजनेच्या नियमांमध्ये केला मोठा बदल

तसेच पोलिस ठाण्याच्या परिसरात चौकशी केली. त्यावर तिचा नातू ज्ञानेश्वर सुभाष काजळे (वय २२, रा. शिवकल्याण मित्र मंडळ, कोथरूड) हे स्वतः तेथे आले. आजी शनिवारी सकाळी दहा वाजता नेहमीप्रमाणे वस्तीमध्ये फिरण्यासाठी गेली होती. ती परत आली नाही, असे तिच्या नातवाने सांगितले. त्यानुसार आम्ही सुतारदरा परिसरात शोध घेत होतो. सोशल मीडियावरील तिचे फोटोपाहून नातेनाईक वारजे माळवाडी येथे आले असता तिला त्यांच्या ताब्यात देण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

दहा दिवसांतील दुसरी घटना

वारजे माळवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत दहा दिवसांतील अशा प्रकाराची ही दुसरी घटना आहे. कोथरूड येथून ९० वर्षाच्या शैलेजा श्रीपाद धायगुडे या ३० जुलैला वारजे परिसरात रस्ता चुकून आल्या होत्या. त्या कराडहून कोथरूडला भावाकडे आल्या होत्या. कामानिमित्त भावाच्या घरातून त्याबाहेर पडल्या. वयोमानानुसार त्यांना घरी जाण्याचा रस्ता आठवेना आणि त्या रिक्षात बसल्या. घर शोधत होत्या. परंतु त्यांना काय घर सापडले नाही. रिक्षावाल्याने त्यांना वारजे आकाशनगर सोडले. त्यावेळीदेखील अशा प्रकारे सोशल मीडियातून संदेश पाठविल्यावर नातेवाईकांचा पत्ता लागला होता.