पुणे: शहरात वर्षानुवर्षे स्वच्छतेचे काम करणाऱ्या ‘ स्वच्छ ‘ संस्थेलाच यापुढील काळातही काम देण्यात येणार असल्याची ग्वाही महापालिकेतील सत्ताधारी पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी दिली. ‘स्वच्छ’ च्या कामाबद्दल ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव आणि पालिकेतील पदाधिकारी यांच्यामध्ये सोमवारी बैठक झाली. यामध्ये ही ग्वाही देण्यात आली. स्वच्छ संस्थेचा महापालिकेचा करार संपला असून गेल्या काही महिन्यांपासून संस्थेस स्थायी समितीत तात्पुरती मुदतवाढ दिली जात आहे.

या मुदतवाढीवर नाराजी व्यक्त करत ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांनी क्रांती दिनापासून साखळी उपोषणाचा इशारा दिला होता. त्यानंतर भाजप पदाधिकाऱ्यांनी स्वच्छच्या प्रतिनिधींना विनंती करून आंदोलन मागे घेण्याची विनंती केली होती. त्यानुसार, महापालिकेत ही बैठक पार पडली.

अधिक वाचा  मविआचं ठरलं? वंचितला सोबत घेणार नाही? शरद पवारांच्या एका वाक्यामुळे चर्चेला उधाण!

शहरात सुरू असलेले स्वच्छ संस्थेचे काम काढून घेण्याचा कोणताही विचार पालिकेचा नाही. उलट हे काम अधिक चांगल्या पद्धतीने होऊन नागरिकांच्या तक्रारी कमी करण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे. त्यादृष्टीने आवश्‍यक ती पावले उचलली जात असल्याचे सभागृह नेते गणेश बिडकर यांनी सांगितले.

स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार, डॉ. बाबा आढाव यांच्यासह स्वच्छ संस्थेचे सेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते. शहर स्वच्छ ठेवण्याचे काम मोठे कठीण असून ‘स्वच्छ’ शिवाय हे काम होणार नाही. आम्ही यापूर्वी तसेच पुढील काळातही ‘स्वच्छ’ बरोबर असून त्यांच्याबरोबरचा करार वाढवून त्यांना मुदतवाढ देण्याचा निर्णय लवकरात लवकर घेण्यात येईल, असे आश्वासन यावेळी देण्यात आले.

अधिक वाचा  कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे विरोधात लढण्यास ठाकरे गटातील बड्यांचा नकार, आता आयात उमेदवार देण्याची वेळ

स्वच्छ संस्थेच्या माध्यमातून सुरु असलेले काम काढून घेतले जाणार नाही. ‘स्वच्छ’ च्या कामाला मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव तयार करण्याची सूचना आयुक्तांना दिली असून लवकरच योग्य तो निर्णय होईल.

– मुरलीधर मोहोळ ( महापौर )