पुणे : मराठा आरक्षण संदर्भात आतापर्यंत खूपदा बोललो. त्याच-त्या मागण्या मांडून कंटाळलो. महाराष्ट्राला पेटवणे दोन मिनिटांचे काम आहे. पण आपल्याला ते करायचे नाही. आरक्षण मिळवायचे असेल तर समाजाला शिस्त आणि संयम बाळगावा लागेल. न्याय मिळवण्यासाठी आपापसातील मतभेद, हेवेदावे बाजूला ठेवून एकत्रित लढा देणे गरजेचे आहे. तरच आरक्षणाचा लढा यशस्वी होईल, असे आवाहन खासदार संभाजीराजे भोसले यांनी यावेळी केले.

मराठा क्रांती मोर्चाची आरक्षण संदर्भात राज्यस्तरीय व्यापक बैठक पुण्यात आयोजित करण्यात आली होती. त्यात संभाजीराजे यांनी आपली भूमिका जाहीर केली. याप्रसंगी राज्यातील जवळपास १७५ तालुक्यांतून पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. सन २०१६ ते २०२१ या पाच वर्षात मराठा समाजाने ‘काय कमावले आणि काय गमावले’ याचा व्यापक आढावा या बैठकीत घेण्यात आला. याप्रसंगी संभाजीराजे यांचे चिरंजीव शहाजीराजे छत्रपती, मराठा क्रांती मोर्चाचे राजेंद्र कोंढरे, राजेंद्र कुंजीर, सचिन आडेकर, धनंजय जाधव व इतर मान्यवर उपस्थित होते.

अधिक वाचा  कुसुमाग्रज निवासस्थानापासून वाजत गाजत ग्रंथदिंडी; साहित्य संमेलन होणार अध्यक्षाविना!

संभाजीराजे म्हणाले, संभाजीराजे छत्रपती म्हणाले, बहुजन समाजाला आरक्षण मिळावे ही छत्रपती शाहू महाराजांची भूमिका होती. सामाजिक सलोखा त्यांनी नेहमीच जपला आहे. तोच वारसा, भूमिका मी पुढे नेत आहे. राज्यात इतर मागास वर्ग (ओबीसी) समाजाला शैक्षणिक सवलती जास्त आहेत. राज्य सरकारने त्या मराठा समाजाला लागू करायला हव्यात. पण सरकार ते करत नाही. इतरही २२ मागण्या केल्या आहेत. मात्र, त्यावरही ठोस उपाय सरकार करत नाही.