पुणे : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्द्यावरुन जोरदार राजकारण सुरु आहे. सत्ताधारी आणि विरोधकांचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. तर दुसरीकडे मराठा क्रांती मोर्चाकडून पुण्यात राज्यव्यापी बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. या बैठकीला खासदार संभाजीराजे छत्रपती उपस्थित आहेत. मात्र, संभाजीराजे छत्रपती बोलायला उभे राहिल्यावर त्यांच्यासमोरच समन्वयकांचाच गोंधळ पाहायला मिळाला. बैठकीत यावेळी बोलू न दिल्याचा आरोप करत, औरंगाबादेतील एका समन्वयकाने गोंधळ घातल्याचं पाहायला मिळालं.

पुण्यात आज मराठा समाजाची राज्यस्तरीय बैठक घेण्यात आली. यात मराठा समाजाकडून सरकारकडे करण्यात आलेल्या मागण्यांचा ज्या त्या जिल्ह्यातील समन्वयकांकडून विषयवार आढावा घेण्यात आला. त्यानंतर संभाजीराजे छत्रपती बोलण्यासाठी उभे राहिले असता. एका समन्वयकाने बोलण्यासाठी वेळ मागितला. त्यावेळी या बैठकीत काही काळ गोंधळ पाहायला मिळाला. आपल्याला बोलू दिलं जात नसल्याचा आरोप त्या समन्वयकाने केला. त्यावेळी संभाजीराजे यांनी सगळ्यांना प्रतिनिधित्व करण्याची संधी देण्यात आली असल्याचं सांगत त्या समन्वयकाची समजूत काढत वातावरण शांत केल्याचं पाहायला मिळालं.

अधिक वाचा  ४ डिसेंबरला का साजरा केला जातो? भारतीय नौदल दिन; जाणून घ्या इतिहास आणि महत्व

‘मराठा आरक्षण मुद्यावर आता खेळ नको’

‘मराठा आरक्षण मुद्यावर आता खेळ नको. आम्ही आता जो निर्णय घेऊ तो शासनाला परवडणारा नाही. मराठा समाजाच्या आरक्षणाची दखल घेतली नाही तर कोणतेही सरकार महाराष्ट्रावर राज्य करणार नाही, असा सज्जड दम मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या चिंतन बैठकीत देण्यात आला. ही बैठक काल तुळजापूरमध्ये पार पडली. जे आमदार खासदार मराठा समाजाला मदत करीत नाहीत हेटाळणी करतात त्यांना यापुढे विचार करावा लागेल, असा इशाराही यावेळी मराठा क्रांती ठोक मोर्चाकडून देण्यात आलाय.

उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर येथे मराठा क्रांती ठोक मोर्चाची चिंतन बैठक काल पार पडली. या बैठकीमध्ये मोर्च्याचे राज्यातील विविध समन्वयक उपस्थित होते. जवळपास दोन तास चाललेल्याया बैठकीमध्ये विविध ठराव घेण्यात आले. या ठरावाची अंमलबजावणी कशी करायची, याचा निर्णय राज्यस्तरीय मेळाव्यात घेण्यात येईल, असं आयोजकांनी यावेळी सांगितले.