शहर परिसरातील उद्योगांतील जुलै महिन्यातील उत्पादनाची पातळी ७८ टक्क्यांवर पोचली असून मनुष्यबळ उपस्थितीचे प्रमाणही ७८ टक्क्यांवर झाले आहे. जून महिन्यांत हे प्रमाण अनुक्रमे ७३ आणि ७७ टक्के होते, असे मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज ॲण्ड अॅग्रिकल्चरच्या (एमसीसीआयए) सर्वेक्षणातून आढळले आहे.

कोरोना निर्बंधांचा उद्योगांवर कसा परिणाम होत आहे, याचा अभ्यास करण्यासाठी ‘एमसीसीआयए’ने गेल्या १५ महिन्यांपासून शहर परिसरातील उद्योगांचे सर्वेक्षण सुरू केले आहे. १६व्या सर्वेक्षणातून उद्योगांच्या परिस्थितीत सुधारणा होत असली, तरी फेब्रुवारी- मार्चमध्ये उत्पादनाचे प्रमाण ८५ टक्के, तर मनुष्यबळ उपस्थिचे प्रमाण ८६ टक्के होते. ते गाठण्यासाठी अजून काही काळ जावा लागेल, असे ‘एमसीसीआयए’च्या सर्वेक्षणातून आढळले.

अधिक वाचा  महापालिका निवडणूक लांबणीची शक्यता; प्रतीक्षा सरकारच्या अधिसूचनेची

या सर्वेक्षणात शहर परिसरातील सूक्ष्म, लघु, मध्यम आणि मोठ्या उद्योगांच्या १५० प्रतिनिधींचा समावेश आहे. त्यात ६६ टक्के उत्पादन, १४ टक्के सेवा आणि २० टक्के दोन्ही क्षेत्रांचा समावेश आहे. कोरोनापूर्व काळातील परिस्थिती उद्योगांनी गाठली आहे, असे ३० टक्के उद्योगांना वाटते, तर उद्योग पूर्वस्थितीत येण्यासाठी आणखी ६ महिने लागतील, असे ५२ टक्के उद्योगांना वाटत आहे. उद्योगांची परिस्थिती सुधारून ते पूर्ववत होण्यासाठी सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लागेल, असे १८ टक्के उद्योगांचे म्हणणे असल्याचे सर्वेक्षणात म्हटले आहे.

”शहर परिसरातील उद्योगांची परिस्थिती दर महिन्यात सुधारत आहे, हे सुचिन्ह आहे. परंतु, या वर्षीच्या फेब्रुवारी आणि मार्चमध्ये उद्योगांची जी परिस्थिती होती, ती अद्याप गाठली नाही. कोरोनापूर्वीची परिस्थिती गाठण्यासाठी नक्कीच अजून काही कालावधी लागेल. तसेच कोरोना रुग्णांची घटते प्रमाण लक्षात घेऊन निर्बंध शिथिल करण्याची गरज आहे. तसेच लसीकरणाला गती देण्यासाठी उद्योग आणि स्थानिक प्रशासनाने आणखी प्रयत्न केले पाहिजेत.”

अधिक वाचा  शाळेची घंटा एक डिसेंबरपासून वाजणार....

– प्रशांत गिरबने, महासंचालक, एमसीसीआयए