नवी दिल्ली : प्रसिद्ध उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला यांनी कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या व्होडाफोन-आयडिया कंपनीच्या बिगर कार्यकारी संचालकपदाचा आणि बिगर चेअरमनपदाचा राजीनामा दिला आहे. कंपनीच्या संचालक मंडळानं त्यांचा राजीनामा मंजूर केला असून नवे बिगर चेअरमनपदी हिमांशू कपानिया यांची नियुक्ती केली. याबाबत सेबी आणि शेअर बाजारांनाही सूचना देण्यात आली आहे. ४ ऑगस्ट २०२१ पासून बिर्ला यांचा राजीनामा ग्राह्य धरला जाणार आहे.

व्होडाफोन-आयडियाचं अस्तित्व धोक्यात

बिर्ला यांनी वित्त सचिवांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं की, जर सरकारला इतर कोणी ही कंपनी चालवण्यासाठी सक्षम असल्याचं वाटत असेल तर त्या कंपनीला ते आपली भागीदारी देण्यासाठी तयार आहेत. परदेशी गुंतवणूकदारांमध्ये भरवसा टिकवून ठेवण्यासाठी सरकारला पावलं उचलण गरजेचं आहे. कारण जर सरकारने लवकरात लवकर आवश्यक पावलं उचलली नाहीत तर व्होडाफोन-आयडिया कंपनीचं अस्तित्व धोक्यात येऊ शकतं.

अधिक वाचा  कोथरूड थोरात उद्यान्यामधील मोनोरेल प्रकल्प नागरिकांच्या इच्छेविरुद्ध होणार नाही: मनपा आयुक्त

बिर्लांनी सरकारला केली भागीदारी घेण्याची विनंती

यापूर्वी कुमार मंगलम बिर्ला यांनी व्होडाफोन-आयडिया कंपनीचं अस्तित्व टिकवण्यासाठी आपली प्रवर्तक भागीदारी सोडण्याची मागणी सरकारकडे केली होती. बिर्ला यांनी गेल्या दिवसांपूर्वी कॅबिनेट सचिवांना पत्र लिहून कोणत्याही सरकारी किंवा भारतीय वित्तीय कंपनीला आपली भागीदारी देण्यासाठी आपण तयार असल्याचं म्हटलं होतं.

कुमार मंगलम बिर्ला हे व्होडाफोन-आयडियाचे प्रमोटर-चेअरमन आहेत. सध्या या कंपनीचं बाजारमूल्य सुमारे २४,००० कोटी रुपये आहे. कुमार मंगलम यांची कंपनीत २७ टक्के भाग भांडवल आहे. तर ब्रिटनच्या व्होडाफोन पीएलसीमध्ये त्यांच ४४ टक्के भाग भांडवल आहे. व्होडाफोन-आयडियावर सध्या १ लाख कोटी रुपयांचं कर्ज आहे.