पुणे शहरात आज दुपारी ४ वाजेनंतर जी दुकाने सुरु होती, त्या दुकानांमध्ये पोलीस आणि महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी जाऊन व्यापाऱ्यांना दुकाने बंद करण्यास भाग पाडलं, शिवाय पोलीस दंडात्मक कारवाई करतानाही दिसून आले . मात्र, आम्ही कारवाईला सामोरे जाण्यास तयार आहोत, आज ज्या प्रकारे आमची दुकाने सुरू आहेत, तशीच उद्या देखील सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. अशी भूमिका पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी स्पष्ट केली आहे.

“काही ठिकाणी पोलिसांनी जाऊन जबरदस्ती केलेली आहे. दुकानं बंद करायला लावली आहेत. छोटे व्यापारी एखादेवेळी घाबरलेले देखील असतील. परंतु आम्ही पोलिसांना सांगितलं आहे की, तुम्हाला जे काही खटले दाखल करायचे असतील किंवा दंड करायचा असेल तर तुम्हा कायदा दाखवा आणि दंडाची रक्कम सांगा, आमचे व्यापारी भरायला तयार आहेत. परंतु पोलिसांनी जबरदस्ती दुकाने बंद करायला लावली आहेत. काही ठिकाणी लोकांनी परत दुकाने उघडली आहेत, आम्ही लोकांना मेसेज पाठवणार आहोत की तुम्ही घाबरू नका.” असं पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी सांगितलं आहे.

अधिक वाचा  अभिनेता गोविंदाचा शिवसेनेत प्रवेश, पक्षप्रवेश करताच म्हणाला, ‘मी 14 वर्षांच्या वनवासानंतर..’

नव्या अनलॉक नियमावलीवर पुण्याचे व्यापारी नाराज; म्हणाले…

करोना काळातील निर्बंध शिथिल करत अनलॉकबाबतची नवी नियमावली राज्यसरकारने सोमवारी जाहीर केलेली आहे. राज्यभरातील जवळपास २५ जिल्ह्यांना याद्वारे दिलासा मिळणार आहे. मात्र पुणे, साताऱ्यासह ११ जिल्ह्यांमध्ये पूर्वीचेच निर्बंध कायम असणार आहेत. या जिल्ह्यांमध्ये तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू असणार आहेत.

येथे मोठ्या प्रमाणावर पॉझिटीव्हिटी दर आणि दैनंदिन वाढती रुग्ण संख्या पाहता या जिल्ह्यांतील स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्रशासन किती प्रमाणात कडक निर्बंध लावायचे त्याचा निर्णय घेतील, असे सांगितले गेले आहे. मात्र या निर्णयावर पुण्यातील व्यापारी महासंघाने तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे. याचेच पडसाद आता उमटताना दिसत आहेत. व्यापारी वर्गाकडून निर्बंध झुगारून दुकानं सुरू ठेवण्याची वेळ वाढवली जात असल्याचे दिसत आहे. तर, अशा व्यापाऱ्यांवर पोलीस व मनपा प्रशानसनाकडून दंडात्मक कारवाई केली जात आहे. मात्र तरी देखील व्यापारी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.