पुणे – सिंहगड रस्त्यावर वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी राजाराम पूल ते फन टाइम थिएटरपर्यंत उभारण्यात येणाऱ्या दोन किलोमीटर लांबीच्या उड्डाणपुलास आज महापालिका स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. त्यासाठी तब्बल ११८ कोटी ३७ लाख ९३१ रुपये खर्च येणार आहे. या उड्डाणपुलाचे नियोजन करताना मेट्रोचाही विचार करण्यात आला आहे.

सिंहगड रस्त्यावर राजाराम पुलापासून पुढे वडगाव, धायरी, नऱ्हे, नांदेड गाव, खडकवासला ही गावे झपाट्याने विकसित होत आहेत. रोज लाखो वाहने या रस्त्यावरून जातात. या रस्त्याला पर्यायी मार्ग नसल्याने रोज सकाळी व सायंकाळी वाहतूक कोंडी होऊन वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात. त्यासाठी उड्डाणपूल उभारण्याची मागणी होत होती. महापालिकेने या रस्त्यावर उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय घेत २०१८-२०१९ या वर्षात १० कोटी रुपये मंजूर केले होते. या कामासाठी सल्लागारही नियुक्त केला होता. सल्लागाराने उड्डाणपूल बांधण्यासाठी चार पर्याय सुचविले होते. त्यापैकी राजाराम पूल ते फन टाइम थिएटरपर्यंत उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. २०१९-२०२० मध्ये उड्डाणपुलासाठी ३० कोटी रुपयांची तरतूद केली होती. त्यानंतर निविदा प्रक्रिया राबविली. या पुलासाठी लागणारी १३५ कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करायला स्थायी समितीने ०७ जून २०२१ रोजी मंजुरी दिली होती. ही रक्कम टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून दिली जाणार आहे.

अधिक वाचा  मुंबईच आर्थिक राजधानी राहणार कुणी कितीही स्वप्न पहा; नवाब मलिक हे म्हणाले

राजारामपुलापासून सिंहगडच्या दिशेने जाणाऱ्या उड्डाणपुलाची लांबी २१२० मीटर इतकी आहे. तर स्वारगेटकडे येणाऱ्या पुलाची लांबी १५४० मीटर इतकी असणार आहे. उड्डाणपूल झाल्यानंतर रोज सव्वालाख वाहने या उड्डाणपुलावरून जाणार आहेत. दुहेरी वाहतुकीसाठी पुलाची रुंदी १६.३ मीटर आणि एकेरी वाहतुकीसाठी पुलाची रुंदी ८.१५० मीटर असणार आहे. भविष्यात मेट्रो मार्गिकेचा विचार करून आवश्यक ती जागा ठेवण्यात आली आहे, अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी दिली.

• ११८.३७ कोटी उड्डाणपुलासाठी खर्च

• २१२० मीटर उड्डाणपुलाची लांबी

• १६.३ मीटर उड्डाणपुलाची रुंदी

• ३६ महिने (पावसाळा सोडून) कामाचा कालावधी