नीरा : दोन दिवसांपूर्वी पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील बेलसर येथे झिका विषाणूची एका ५० वर्षीय महिलेला लागण झाल्याचे समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. याच दरम्यान आता नीरा (ता. पुरंदर) येथे कोरोनाच्या ‘डेल्टा प्लस’ विषाणूची लागण झाल्याचे समोर आले आहे. दोन रुग्णांना या विषाणूची बाधा झाली असून त्यांच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती आरोग्य प्रशासनाने दिली आहे. यावेळी नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहनही करण्यात आले आहे.

नीरा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात काल कोरोनाच्या डेल्टा प्लस या प्रकारातील विषाणूची लागण झालेले दोन रुग्ण आढळून आल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. उज्वला जाधव यांनी दिली आहे. यामध्ये नीरा जवळच्या थोपटेवाडी येथील एका १४ वर्षाच्या मुलाला तर एका ४८ वर्षीय व्यक्तीला या विषाणूची बाधा झाली आहे.

अधिक वाचा  न्यूझीलंडचा पहिला डाव 62 धावांतच आटोपला; फिरकीसमोर घसरगुंडी

१४ वर्षीय मुलगा गेली आठ दिवस कोरोना बाधित असुन त्याच्या आई वडिलांना ही कोरोनाची बाधा झाली होती पण त्यांच्या डेल्टा प्लसचे कोणतेही विषाणू आढळून आले नाहीत. ४८ वर्षीय महिला गेली १२ दिवसांपूर्वी कोरोनाबाधित झाल्या होत्या. दोन्ही रुग्णांची तब्येत चांगली असून लोकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी उज्वला जाधव यांनी केले आहे.

या दोघांसह २५ व्यक्तींच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या त्यापैकी या दोघांचे डेल्टा प्लसचे अहवाल बाधित आले. हा विषाणू आढळल्या नंतर या रुग्णाच्या परिसरातील लोकांचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. थोपटेवाडी गावात सर्वेक्षण करण्यात येत आहे. रविवारी सुमारे १०० लोकांचे सर्वेक्षण आरोग्य कर्मचाऱ्यांनी केल्याची माहिती नीरा प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रमुख डॉ. अक्षय मव्हाण यांनी सांगितले. लोकांनी प्रशासनाला सहकार्य करून आजारी रुग्णांची तपासणी करून घ्यावी, असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी उज्वला जाधव यांनी केले आहे.

अधिक वाचा  Omicronच्या प्रचंड धास्तीत; WHO कडून माहिती

पुरंदर तालुक्यात आढळला महाराष्ट्रातील पहिला ‘झिका’चा रुग्ण

पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात प्राथमिक आरोग्य केंद्र बेलसर येथील आरोग्य केंद्रात झिका विषाणूचा रुग्ण आढळून आला आहे. हा महाराष्ट्रातील पहिला झिका विषाणूची लागण झालेला रुग्ण आहे. बेलसरमध्ये गेल्या महिन्याभरात तापाचे रुग्ण आढळून येत होते. तेथील ४१ जणांचे नमुने पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यापैकी २५ जणांना चिकनगुनिया तर ३ जणांना डेंग्यू झाल्याचे स्पष्ट झाले असून बेलसर एका ५० वर्षाच्या महिलेस झिका विषाणूची बाधा झाल्याचा निष्कर्ष ३० जुलै रोजी प्रयोगशाळेने दिला आहे.

अधिक वाचा  सरकारने पंतप्रधान आवास योजनेच्या नियमांमध्ये केला मोठा बदल

बेलसरमधील पाच रुग्णांचे नमुने १६ जुलै रोजी राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था येथे तपासण्यासाठी पाठविले असता त्यापैकी तीन जणांना चिकनगुनिया आजाराचे निदान झाले. २७ ते २९ जुलै या कालावधीत राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेच्या डेंग्यू चिकनगुनिया विभागाचे प्रमुख डॉ. योगेश गुरव यांच्या नेतृत्वाखालील चमूने बेलसर आणि परिंचे या भागात भेट देऊन सुमारे ४१ संशयित रुग्णांचे रक्तजल नमुने संकलित केले. त्यामध्ये महिलेला झिका विषाणूची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. महिला चिकनगुनिया बाधित देखील असल्याचे स्पष्ट झाल्याने हा मिश्र विषाणू संसर्ग आहे. महिला सध्या पूर्णपणे बरी झालेली असून कोणतीही लक्षणे नाहीत. तिच्या घरामध्येही कोणाला लक्षणे नाहीत.