पुणे – जिल्ह्यात जुलै महिन्यात सरासरीपेक्षा २५.७७ टक्के जास्त पावसाची नोंद झाली आहे. तर गेल्या दोन महिन्यात सरासरीपेक्षा ३४ टक्के जास्त पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी ४८५.५ मिलिमीटर ऐवजी ६५०.८ मिलिमीटर इतका पाऊस पडला होता. त्यामुळे जिल्ह्यात चांगल्या पावसाची नोंद झाल्याचे यातून स्पष्ट होत आहे.

जुलै महिन्यात शहरात १९३ मिलिमीटर इतका पाऊस पडला आहे. तर गेल्या काही दिवसांपासून शहर आणि परिसरात पावसाचा जोर कमी झाला आहे. शहरात अधूनमधून कमी जास्त स्वरूपाचा पाऊस पडत आहे. तर रविवारी शहरात १.४ मिलिमीटर तर लोहगाव येथे २ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली होती. पुढील काही दिवस शहरात पावसाचा जोर कमी राहणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविले आहे.

अधिक वाचा  महापालिका प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा राज्य निवडणूक आयोगाला सादर

रविवारी शहर व परिसरात सकाळपासूनच अंशतः ढगाळ वातावरणाचे सावट कायम होते. तर अधूनमधून ऊन ही पडत होते. मात्र पुढील आठवडाभर शहर आणि परिसरात अंशतः ढगाळ वातावरण राहणार असून हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. परंतु घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा ही देण्यात आला आहे.