पुणे : राज्यातील पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांचे दौरे सुरु आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी संबंधित भागाशी संबंध नसलेल्या नेत्यांनी त्या भागात पाहणी दौरा करु नये. जेणेकरुन यंत्रणा अडकून पडणार नाही, असं आवाहन केलं होतं. मात्र, त्यानंतर आमदार रोहित पवार यांनी पूरग्रस्त भागाचा दौरा केला. रोहित पवारांच्या या दौऱ्यावरुन माजी मंत्री सदाभाऊ खोत आणि आमदार नितेश राणे यांनी रोहित पवारांना टोले लगावले आहेत. राणे आणि खोतांच्या या टोलेबाजीला आता रोहित पवारांनीही उत्तर दिलंय.

सोशल मीडियावर ट्वीट करुन मोकळं व्हायचं. मात्र, प्रत्यक्ष कुठेही जायचं नाही. त्यामुळे या लोकांना महत्व देण्याचं कारण नाही. फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या कोल्हापूर दौऱ्यात झालेल्या भेटीवरही रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संकटकाळात सर्वांनी एकत्र आलं पाहिजे. देवेंद्र फडणवीसही त्या भागात फिरत आहेत. माझीही या भागात देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली होती, असं रोहित पवार म्हणाले. पंचनामे संपल्यावर येत्या 10 ते 12 दिवसांत पूरग्रस्तांना सरकारकडून मदत मिळणार असल्याचं रोहित पवार यांनी सांगितलं.

अधिक वाचा  "महाराष्ट्रातही आमचे मतभेद आहेत तरीही..."यूपीएच्या नेतृत्वावरुन संजय राऊतांनी ममतांना दिला सल्ला

सदाभाऊ खोतांची खोचक टीका

पूरग्रस्त भागांचे दौरे टाळण्याचे आवाहन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं खरं पण त्यानंतरही त्यांचे नातू रोहित पवार यांनी चिपळूणचा दौरा केला. कोकणात जाऊन परिस्थितीची पाहणी केली. नेमका हाच धागा पकडत माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी बोचरा सवाल उपस्थित केला.

राजकीय नेत्यांनी पूरग्रस्त भागाचे दौरे करून नयेत, असं आजोबांनी सांगितलं… आजोबांच्या सल्ल्याला नातूच मानत नाही… कर्जत-जामखेडचे आमदार चीपळूणच्या दौऱ्यावर…. आजोबांचा हा सल्ला फक्त राज्यपाल व फडणवीसांकरिता होता?, असा बोचरा सवाल सदाभाऊ खोत यांनी विचारला.

आमदार नितेश राणेंची टीका

अधिक वाचा  अनिल अंबानी अडचणीत? रिझर्व बँकेने सुरू केली कायदेशीर प्रक्रिया

सातत्याने पवार कुटुंबात विसंगती दिसते. अवेळी बोलणं, जास्त बोलणं हे कधीच पवार कुटुंबीय करत नाही. पार्थ पवार ,सुप्रिया सुळे अस बोलताना कधी दिसले नाहीत. रोहीत पवारांनी आपल्या आजोबांकडून योग्य गोष्टी शिकल्या पाहिजेत. त्यांचं ऐकलं पाहिजे.

नातूच आजोबांचा विचार पाळत नसेल तर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी का पाळावे असा प्रश्न सगळ्यांच्या समोर येतो. म्हणून रोहीतजींनी थोडं शिकून मगच पावलं टाकावीत असा माझा मैत्रीचा सल्ला आहे, असा टोला नितेश राणे यांनी लगावला.