पुणे : पुणे जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोना डोकं वर काढताना दिसत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही पुण्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली होती. त्याचबरोबर कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाणही पुण्यात वाढलं होतं. अशावेळी राज्य सरकार आणि पुणे जिल्हा प्रशासनानं कडक निर्बंध लागू केले होते. असं असतानाही पुण्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव सुरुच असल्याचं दिसून येत आहे. कारण, राज्यात 25 जिल्ह्यातील कोरोना निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे, तर 11 जिल्ह्यात अद्यापही लेवल 3 चे निर्बंध कायम आहेत. त्यात पुणे जिल्ह्याचाही समावेश आहे. दरम्यान, पुण्यातील जुन्नर आणि इंदापूर तालुक्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसून येत आहे.

अधिक वाचा  अभिजीत बिचुकलेंना करोना; हिंदी ‘बिग बॉस’ मध्ये राखी सावंतची निवड

जुन्नर तालुक्यात 703 सक्रिय रुग्ण

जुन्नर तालुक्यात पुन्हा एकदा कोरोनानं डोकं वर काढलं आहे. जिल्ह्यात सर्वाधिक कोरोना रुग्ण हे जुन्नर तालुक्यात आढळले आहेत. तालुक्यात आतापर्यंत एकूण 18 हजार 928 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 615 जणांचा कोरोनामुळे बळी गेलाय. 30 जुलै 2021 रोजी तालुक्यात एकूण कोरोना रुग्णांची संख्या 703 इतकी झाली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत जुन्नर तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या 1 हजाराचा टप्पा ओलांडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

इंदापूर तालुक्यात 3 दिवसात 160 नवे रुग्ण

जुन्नर पाठोपाठ इंदापूर तालुक्यातही कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. मागील 3 दिवसात तालुक्यात 160 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे इंदापूरकरांची चिंता वाढली आहे. आज दिवसभरात कोरोनाचे 63 नवे रुग्ण आढळून आल्यामुळे प्रशासनासमोर अडचणी आता वाढल्या आहेत. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांनी सरकारने घालून दिलेल्या कोरोना निर्बंधांचे तंतोतंत पालन करावे, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

अधिक वाचा  ५०/५० ही पुडी.....हे तर पाच वर्षे पद; राऊत

पुणे जिल्ह्यात लेवल 3 चे निर्बंध

कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झालेल्या आणि पॉझिटिव्हिटी रेट कमी असलेल्या 25 जिल्ह्यात कोरोना निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात आली आहे, तशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलीय. तर राज्यातील 11 जिल्ह्यात मात्र लेवल 3 चे निर्बंध कायम असतील अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. या 11 जिल्ह्यात पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा समावेश आहे.

पश्चिम महाराष्ट्र – पुणे सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर

कोकण – रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पालघर

मराठवाडा – बीड

उत्तर महाराष्ट्र – अहमदनगर