पुण्यातील महिला पोलीस उपायुक्त यांची एक ऑडिओ क्लिप सध्या जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये पोलीस उपायुक्त आपल्या पोलीस कर्मचाऱ्याला फुकट बिर्याणी मागत असल्याचं ऐकायला मिळत आहे. ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत.

काय आहे व्हायरल ऑडिओ क्लिप?

ऑडिओ क्लिपमध्ये पोलीस उपायुक्त आपल्या एका पोलीस कर्मचाऱ्यासोबत बोलत आहेत, पुण्यात कुठे बिर्याणी, प्रॉन्झ कुठे चांगले मिळतात. तसेच पोलीस कर्मचाऱ्याला आपल्या हद्दीतल्या हॉटेलला पैसे द्यायची काय गरज? असं म्हणत आयएएस असलेल्या पतींना मटण बिर्याणी आवडते तर आपल्याला चिकन बिर्याणी अशी ऑर्डर दे सांगतात. यासोबतच पैसे मागितल्यास पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना सांग असे सुद्धा म्हणत आहेत.

अधिक वाचा  भ्रष्टाचारमुक्त अन् पारदर्शक राजकारणास आम आदमीच पर्याय ; कृष्णा गायकवाड यांचे पत्राद्वारे कार्यकर्त्यांना आवाहन

चौकशीचे आदेश

ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना विचारले असता त्यांनी म्हटलं, पोलीस उपायुक्त यांची व्हायरल झालेली ऑडिओ क्लिप मी ऐकली आहे. या प्रकरणी पोलीस आयुक्तांना चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

पोलीस उपायुक्तांनी आरोप फेटाळले

या प्रकरणी संबंधित पोलीस उपायुक्तांसोबत न्यूज 18 लोकमतने संवाद साधला असता त्यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. हे एक षडयंत्र असून ऑडिओ एडिट केल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. आपल्याला नाहक बदनाम केलं जात असून याप्रकरणी सायबर पोलिसांत तक्रार करण्याचंही त्यांनी म्हटलं आहे.