मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने पुण्याच्या एका कंपनीत 20 लाख डॉलर म्हणजेच जवळपास 14.8 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. डिजीटल एंटरटेनमेंट ऍण्ड टेक्नोलॉजी कंपनी जेटसिंथेसिसने  गुरुवारी सचिन तेंडुलकरने आपल्या कंपनीत गुंतवणूक केल्याचं जाहीर केलं आहे. जेटसिंथेसिस पुण्याची कंपनी असून भारताशिवाय जपान, ब्रिटन, युरोपिय संघ, अमेरिका या ठिकाणी त्यांची ऑफिस आहेत.

या गुंतवणुकीसह तेंडुलकरचं या कंपनीसोबतचं नातं आणखी घट्ट झालं आहे. या दोघांमध्ये आधीपासूनच डिजीटल क्रिकेट डेस्टिनेशन ‘100 MB’ आणि इमर्सिव क्रिकेट गेम ‘सचिन सागा क्रिकेट’, ‘सचिन सागा वीआर’ यांच्यासाठी जॉईंट व्हेन्चर आहे.

अधिक वाचा  ओमायक्रॉन वर बूस्टर डोस की कोविशिल्ड लस प्रभावी; पूनावाला हे म्हणाले

‘जेटसिंथेसिससोबत माझे संबंध 5 वर्ष जुने आहेत. आम्ही सचिन सागा क्रिकेट चॅम्पियन्सपासून प्रवास सुरू केला, याचसोबत व्हर्चुअल रियलिटी क्रिकेटने हे नातं आणखी मजबूत केलं. हा गेम लोकप्रिय झाला असून 2 कोटींपेक्षा जास्त जणांनी हा गेम डाऊनलोड केला आहे,’ असं सचिन म्हणाला.

100 MB सोबत कंपनीने सचिनच्या प्रशंसकांना त्याच्यासोबत बोलण्याची संधी दिली आहे, असं जेटसिंथेसिसचे उपाध्यक्ष आणि एमडी राजन नवानी म्हणाले. ‘या गुंतवणुकीसह आम्ही सचिनला जेटसिंथेसिस फॅमिलीचा आणखी गरजेचा सदस्य बनवण्यासाठी उत्सूक आहोत. आम्हाला भारत रत्न, मूल्यांशी पक्का असलेला व्यक्ती, जागतिक ब्रॅण्ड असलेल्या सचिनचा अभिमान आहे,’ असं वक्तव्य राजन नवानी यांनी केलं.